कधीकाळी टीचर असणारा हा साऊथचा कॉमेडियन आहे सुपरस्टार्सपेक्षा ‘महाग’, नाव ब्रह्मानंदम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:23 IST2022-02-01T12:21:31+5:302022-02-01T12:23:55+5:30
Brahmanandam Birthday: इतक्या कोटींचा मालक आहे हा कॉमेडी किंग, एका सिनेमासाठी घेतो इतकी फी

कधीकाळी टीचर असणारा हा साऊथचा कॉमेडियन आहे सुपरस्टार्सपेक्षा ‘महाग’, नाव ब्रह्मानंदम!
साऊथ चित्रपटांतील सर्वात लोकप्रिय चेहरा कुणाचा असेल तर तो आहे कॉमेडियन ब्रह्मानंदम (Brahmanandam) यांचा. आज ब्रह्मानंदम यांचा वाढदिवस. आज ते 66 वर्षांचे झालेत. 1 फेब्रुवारी 1956 रोजी आंध्राच्या साटेनापल्ली जिल्ह्यातील मुपल्ला गावात जन्मलेले ब्रह्मानंदम साऊथच्या प्रत्येक दुसऱ्या सिनेमात दिसतातच दिसतात. सुपरस्टार्सपेक्षाही ते जास्त फी घेतात. आज कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या ब्रह्मानंदम यांचे बालपण अतिशय गरिबीत गेलं. अगदी दोन वेळच्या भाकरीसाठीही त्यांच्या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागे. (Brahmanandam Birthday )
ब्रह्मानंदम लहान असताना त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पण तरिही ते शिकले. त्यांच्या कुटुंबातील एमए पर्यंत शिकलेले ते पहिले होते. यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. कॉलेजमध्ये ते नेहमी विद्यार्थ्यांना मिमिक्री करुन हसवायचे. एकेदिवशी इंटर कॉलेज ड्राम कॉम्पिटिशनमध्ये त्यांना सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर नाटकात त्यांची रुची वाढत गेली. अखेर अभिनयासाठी ब्रह्मानंदम यांनी नोकरीला लाथ मारली आणि अभिनेता बनण्याचा निर्णय घेतला.
प्रसिद्ध तेलगु डायरेक्टर जन्धयाला यांनी ‘मोद्दाबाई’ या नाटकातील ब्रह्मानंदम यांचा अभिनय बघून ‘चन्ताबाबाई’ या सिनेमात एक छोटीशी भूमिका दिली होती. त्यानंतर ब्रह्मानंदम यांनी मागे वळून पाहिले नाही. 1000 हून अधिक सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 2007 मध्ये त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. एकाच भाषेतील 700 चित्रपटांमध्ये काम केल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला.
ब्रह्मानंदम आज सुमारे 360 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. भलेही कॉमेडियन अशी त्यांची ओळख आहे. पण त्यांची फी सुपरस्टारपेक्षा कमी नाही. अनेक सुपरस्टारपेक्षा ते अधिक मानधन घेतात. ब्रह्मानंदम एका सिनेमासाठी एक कोटी रुपये मानधन घेतात.
ब्रह्मानंदम यांच्या सिनेमांबद्दल लोकांना बरंच काही ठाऊक आहे, मात्र त्यांच्या कुटुंबाविषयी लोकांना फारसं काही ठाऊक नाही. ब्रह्मानंदम यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी कन्नेगंती आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. थोरल्या मुलाचं नाव राजा गौतम तर धाकट्याचं नाव सिद्धार्थ आहे. राजा गौतमने 2004 मध्ये ‘पल्लाकिलो पेल्लि कुटुरु’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.
देवानं मला लोकांना हसवण्यासाठीच पृथ्वीवर पाठवलं आहे, असं ब्रह्मानंदम मानतात. प्रत्येक कलाकार मेहनत करतो, यात काहीही शंका नाही. पण काही दिवसानंतर त्याच त्या कलाकारांना पडद्यावर बघून लोक थकतात. मात्र माझ्या मते, लोक अद्यापही मला बघून थकलेले नाहीत. देवानं मला लोकांना हसवण्यासाठीच जगात पाठवलं आहे, असं मला वाटतं, असं ब्रह्मानंदम एका मुलाखतीत म्हणाले होते.