कोणाला घाबरतो आमिर खान, भीतीपोटी बाळगतो पिस्तूल? सुनील शेट्टीनं खरं काय ते सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:43 IST2025-06-20T13:42:03+5:302025-06-20T13:43:29+5:30
‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कोणाला घाबरतो आमिर खान, भीतीपोटी बाळगतो पिस्तूल? सुनील शेट्टीनं खरं काय ते सांगितलं
Aamir Khan: 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज (२० जून) त्याचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) प्रदर्शित झाला असून, या वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून तो दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत झळकतो आहे. अभिनयाच्या क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या आमिरचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहतं. आमिर खानबद्दल एक अफवा पुन्हा चर्चेत आली आहे, ती म्हणजे तो स्वतःजवळ पिस्तूल बाळगतो. ही अफवा कितपत खरी आहे, यावर अभिनेता सुनील शेट्टीनं थेट उत्तर दिलं आहे.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने एक जुना किस्सा शेअर केला आहे. त्याने आमिरच्या सुरक्षेबद्दलचं नेमकं सत्य सांगितलं. सुनीलला मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं की "आमिर खानबद्दल असे म्हटले जाते की, तो अंडरवर्ल्डच्या भितीपोटी पिस्तूल बाळगू लागला होता, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?" यावर उत्तर देताना सुनील शेट्टी म्हणाला, "हा सगळा मूर्खपणा आहे. तुम्ही जे ऐकता आणि वाचता ते नेहमीच खरं नसतं. आम्ही इथे पूर्णपणे सुरक्षित आहोत".
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डचा संंबंध
१९९० आणि २००० च्या दशकात बॉलिवूडवर अंडरवर्ल्डचा प्रभाव होता, असं वारंवार म्हटलं जातं. त्या काळात अनेक नामवंत कलाकारांना फिरौतीसाठी फोन कॉल्स आणि धमक्यांचा सामना करावा लागायचा. गुलशन कुमार यांची हत्या आणि राकेश रोशन यांच्यावर झालेला हल्ला या घटना संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला हादरवून गेल्या होत्या. या काळात कलाकारांना केवळ स्वतःच्याच नव्हे, तर आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचीही तीव्र चिंता वाटत असे. मुंबईतील अनेक माफिया ब्लॅक मनीद्वारे बॉलिवूड चित्रपटांसाठी बजेट निर्माण करून देत असत. तसंच कास्टिंगच्या प्रक्रियेतही त्यांचा सहभाग असायचा असं म्हटलं जातं.