अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर श्रेया घोषाल घेणार गाण्यातून ब्रेक? म्हणाली- "कधी कधी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:37 IST2026-03-16T13:36:58+5:302026-03-16T13:37:22+5:30
अरिजीतनंतर आता लोकप्रिय गायिका श्रेया घोषालही गाण्यातून ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेया घोषालने याबाबत वक्तव्य केलं आहे.

अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर श्रेया घोषाल घेणार गाण्यातून ब्रेक? म्हणाली- "कधी कधी..."
बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने काही दिवसांपूर्वीच गायनातून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. अरिजीतने पार्श्वगायन न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी अरिजीतच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. अरिजीतनंतर आता लोकप्रिय गायिका श्रेया घोषालही गाण्यातून ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेया घोषालने याबाबत वक्तव्य केलं आहे.
श्रेया घोषालने एबीपी न्यूजला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाणं गाताना स्टेजवर लिप सिकिंग करण्यावर मत मांडलं. ती म्हणाली की ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर निर्भर राहायला मला अजिबात आवडणार नाही. श्रेयाने सांगितलं. "मला हे खूप विचित्र वाटतं. ज्यादिवशी मला असं काही करावं लागेल त्या दिवशी गाणं गायचं बंद करेन. जोपर्यंत माझा आवाज मला साथ देईल तोपर्यंत मी माझा रियाज चालू ठेवेन. स्टेजवर उभं राहून चाहत्यांसाठी मला लाइव्ह गाणं गायला मला आवडेल".
"कधी कधी मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो. अरिजीत सिंहने हा निर्णय खूप धैर्याने घेतला. अरिजीत सिंग एक अशी व्यक्ती आहे जी संगीतासोबत जोडली गेली आहे. मी संगीत का बनवतोय किंवा यातून मला काय मिळणार आहे, असा विचार ते कधीही करत नाहीत. ज्यातून आनंद मिळतो अशीच गोष्ट ते करतात. त्यांच्यासाठी संगीत सगळ्या गोष्टींपेक्षा मोठं आहे आणि म्हणूनच लोकांचंही त्यांना खूप प्रेम मिळतं", असंही श्रेयाने सांगितलं.
अरिजीत सिंगने गायनातून निवृत्ती घेतल्यानंतर श्रेया म्हणाली होती की "अरिजित सिंगच्या कारकीर्दीचा हा एक नवा टप्पा आहे आणि हा प्रतिभावान कलाकार आता पुढे काय नवीन देणार आहे हे ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मी खरोखरच खूप उत्सुक आहे! मी याला कधीही एका युगाचा अंत म्हणणार नाही. त्याच्यासारख्या उच्च दर्जाच्या कलाकाराला पारंपारिक चौकटीत किंवा ठराविक साच्यात कधीच बांधता येत नाही.प्रिय अरिजित, आता उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे".