चाहत्याने 'I Love You' म्हणताच श्रद्धा कपूरने दिलेलं गोड उत्तर चर्चेत; व्हिडीओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:59 IST2025-09-29T12:58:31+5:302025-09-29T12:59:09+5:30
चाहत्याने व्यक्त केलं प्रेम, मग श्रद्धा कपूर काय म्हणाली? जाणून घ्या...

चाहत्याने 'I Love You' म्हणताच श्रद्धा कपूरने दिलेलं गोड उत्तर चर्चेत; व्हिडीओ तुफान व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या साधेपणा आणि गोड स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असते. श्रद्धाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. बॉलिवूडमधील 'स्त्री' अशी तिची ओळख आहे. अशातच श्रद्धा नुकतंच पार पडलेल्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील पुढील सिनेमा 'थामा'च्या ट्रेलर लाँचला आली होती. या कार्यक्रमातील श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
'थामा'च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमातून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर स्टेजवर उभी असल्याचे दिसून येते. त्याचवेळी गर्दीतून एका चाहत्याने मोठ्याने "I Love You श्रद्धा!" असं म्हणत तिला प्रपोज केलं. चाहत्याच्या या अचानक आलेल्या प्रपोजमुळे अभिनेत्री क्षणभर थक्क झाली. पण पुढच्याच क्षणी तिने लगेच हसून उत्तर दिले, "अरे, खूप उघडपणे... पण, तुला माहितेय ना माझे वडील कोण आहेत?". श्रद्धा कपूरचं हे मिश्किल उत्तर चाहत्यांना प्रचंड आवडलंय. व्हायरल भयानी या इन्स्टाग्राम चॅनेलने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
'थामा'च्या ट्रेलर लाँचसाठी श्रद्धाने खास 'स्त्री' चित्रपटातील तिच्या भूमिकेप्रमाणे लूक केला होता. लाल रंगाची साडी, लांब वेणी, असा हा लूक होता. याच कार्यक्रमात श्रद्धानं चाहत्यांना खास आनंदाची बातमीही दिली. श्रद्धा कपूरने घोषणा केली आहे की, 'स्त्री' या हिट चित्रपटावर आधारित 'छोटी स्त्री' नावाचा एक ॲनिमेटेड चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बच्चेकंपनीसह मोठ्या प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात येत आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये आलेल्या पहिल्या 'स्त्री' चित्रपटानंतर 'रुही', 'भेडिया' आणि 'मुंज्या' यांसारखे चित्रपट याच हॉरर युनिव्हर्सचा भाग बनले. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'स्त्री २' ने तर बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई करून हिंदीतील सर्वात मोठा हिट चित्रपट होण्याचा मान मिळवला होता. आता 'छोटी स्त्री' या मालिकेत एक नवा आणि मनोरंजक अध्याय जोडणार आहे. तर 'थामा' या चित्रपटात आयुषमान खुरानासोबत रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.