'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:50 IST2025-11-22T12:49:44+5:302025-11-22T12:50:36+5:30
'छावा'नंतर लक्ष्मण उतेकर घेऊन येत आहेत तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकरांची कथा, श्रद्धा कपूर घेतेय जोरदार मेहनत

'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' सिनेमात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर सिनेमा आधारित आहे. सिनेमासाठी श्रद्धा प्रचंड मेहनत घेत आहे. दरम्यान सिनेमाच्या शूटिंगवेळी श्रद्धाला दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. फ्रॅक्चर झाल्यामुळे काही काळ शूटिंग थांबलं आहे.
'ईठा' सिनेमाचं शूट सध्या नाशिकजवळील एका गावात सुरु आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्यावर सिनेमा असल्याने श्रद्धा कपूरलानृत्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. इतकी दिग्गज व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणं आणि त्याप्रकारे उत्तम नृत्य करणं हे नक्कीच आव्हानात्मक आहे. हेच आव्हान पेलताना श्रद्धाला सेटवर दुखापत झाली.
मिड डे रिपोर्टनुसार, लावणी नृत्यात अतिशट जलद गतीच्या स्टेप्स आहेत. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात नऊवारी साडी नेसून, जड दागिने आणि कमरपट्टा परिधान करुन ढोलकीच्या तालावर श्रद्धाला नृत्य सादर करायचं होतं. विठाबाईंच्या तरुणपणीची भूमिका तिला साकारायची होती. यासाठी श्रद्धाने १५ किलो वजनही वाढवलं आहे. दरम्यान एक स्टेप करताना तिने पूर्ण वजन डाव्या पायावर दिलं आणि तिचा तोल गेला. यामुळे तिला फ्रॅक्चर झालं आहे. दरम्यान सिनेमाची टीम मुंबईत परतली असून मढ आयलंड येथे श्रद्धा आता भावुक सीन्स शूट करत होती. मात्र तिच्या वेदना आणखी वाढल्या त्यामुळे काही काळासाठी शूट थांबवण्यात आलं आहे. दोन आठवड्यांनंतर श्रद्धा पूर्ण बरी झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे.
लक्ष्मण उतेकरांच्या 'ईठा' सिनेमाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सिनेमात रणदीप हुडा श्रद्धासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. मात्र १ नोव्हेंबरपासूनच शूटिंगला सुरुवात झाली. यासाठी महाराष्ट्रातील गावागावात शूटिंग लोकेशन फायनल केली गेली आहेत. सोलापूर, सातारा आणि कोल्हापूरचा यात समावेश आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई यांना १९५७ आणि १९९० अशा दोन्ही साली राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे.