नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शाहरुख खान करणार 'किंग' सिनेमासंदर्भात घोषणा? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:26 IST2025-12-30T16:24:49+5:302025-12-30T16:26:45+5:30
Shahrukh Khan : बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानच्या चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. आता त्याचे 'पठाण २' आणि 'किंग' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शाहरुख खान करणार 'किंग' सिनेमासंदर्भात घोषणा? व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खानच्या चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. आता त्याचे 'पठाण २' आणि 'किंग' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेषतः 'किंग' चित्रपटातील शाहरुखचा फर्स्ट लूक समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीला शाहरुख या चित्रपटाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नुकतेच शाहरुख खानला एका डबिंग स्टुडिओबाहेर स्पॉट करण्यात आले. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख व्हाईट टी-शर्ट आणि कार्गो पॅंटमध्ये कूल लूकमध्ये दिसत आहे. शाहरुख नक्की काय रेकॉर्ड करत आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, चाहत्यांच्या मते तो 'किंग' चित्रपटाच्या पोस्ट-प्रोडक्शन किंवा टीझरच्या कामासाठी तिथे गेला असावा.
नवीन वर्षात देणार मोठं सरप्राइज?
शाहरुखच्या वाढदिवसाला 'किंग'मधील त्याचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर कोणतीही मोठी अपडेट समोर आली नव्हती. मात्र, आता शाहरुखला स्टुडिओबाहेर पाहिल्यामुळे आणि वर्षाचा शेवट जवळ आल्यामुळे तो नवीन वर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटाची अधिकृत घोषणा किंवा एखादा प्रोमो शेअर करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. शाहरुख स्टुडिओबाहेर दिसण्याच्या एक दिवस आधी, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने सोशल मीडियावर बुद्धिबळातील 'सिंहा'चा फोटो शेअर केला होता, ज्याने मुकुट परिधान केला आहे. या फोटोमुळे 'किंग' चित्रपटाची चर्चा अधिकच रंगली आहे.
कसा असेल शाहरुखचा लूक?
'किंग' चित्रपटात शाहरुख खान पांढऱ्या-काळ्या केसांच्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो जबरदस्त ॲक्शन करताना दिसेल. विशेष म्हणजे, या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची कन्या सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.