"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:01 IST2025-08-21T13:01:15+5:302025-08-21T13:01:51+5:30
शाहरुख खानच्या हाताला काय झालं? म्हणाला...

"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याची पहिली सीरिज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चा काल ट्रेलर लाँच पार पडला. या सीरिजचा प्रीव्ह्यू पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. आर्यनने पहिल्याच प्रयत्नात चाहत्यांना प्रभावित केलं आहे. सगळीकडे या सीरिजचीच चर्चा आहे. काल ट्रेलर लाँचवेळी शाहरुख आणि आर्यनमधलं साम्य तर लोक बघतच राहिले. काल शाहरुखच्या ह्युमरची झलक पुन्हा एकदा दिसली. सध्या तो दुखापतीमुळे त्रस्त आहे. मात्र तरी राष्ट्रीय पुरस्कार उचलायला एक हात पुरेसा असल्याची मिश्कील टिप्पणी त्याने केली.
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या ट्रेलर लाँचला लेकाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख खानही हजर होता. शाहरुख खाननेच स्टेजवर येत सर्व कलाकारांची ओळख करुन दिली. तसंच त्याने सर्वांसोबत मजा मस्तीही केली. तो म्हणाला, "माझ्या हाताला काय झालं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर माझ्या खांद्याला दुखापत झाली. छोटी नाही तर जरा मोठी सर्जरी करावी लागली. त्यामुळे आता मला यातून बरं होण्यासाठी एक-दोन महिने तरी लागतील. पण राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एक हातच पुरेसा आहे".
शाहरुख खानच्या सेन्स ऑफ ह्युमरची कायमच स्तुती होत असते. काल याचीच पुन्हा प्रचिती आली. एकीकडे त्याच्या लाडक्या लेकाची सीरिज येत आहे. तर दुसरीकडे तो 'किंग' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यामध्ये त्याच्यासोबत सुहाना खानही दिसणार आहे. याच सिनेमाच्या शूटवेळी सेटवर शाहरुखला दुखापत झाली. त्यामुळे सिनेमाचं शूट पुढे ढलकण्यात आलं आहे. दरम्यान शाहरुख खानला काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी आली. ३२ वर्षांच्या करिअरमध्ये त्याला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळणार आहे. २०२३ साली आलेल्या 'जवान'सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.