दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 10:29 IST2025-11-12T10:28:34+5:302025-11-12T10:29:11+5:30
एक आठवडा होणार होतं शूट, आता मेकर्स काय निर्णय घेणार?

दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
भारताची राजधानी दिल्ली १० नोव्हेंबर रोजी भीषण स्फोटाने हादरली. लाल किल्ल्याजवळच एका कारमध्ये स्फोट झाला आणि अनेक लोकांचा जीव गेला. या मागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे काही पुरावे सापडले. याचा तपास सध्या सुरु आहे. दरम्यान दिल्ली येथील या स्फोटानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला. रणवीर सिंहच्या 'धुरंधर' सिनेमाचा ट्रेलर लाँच इव्हेंट आज मुंबई येथे होणार होता. मात्र आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. तर दुसरीकडे शाहिद कपूरच्या 'कॉकटेल'सिनेमाचं शूट दिल्लीत सुरु होणार होतं मात्र तेही आता स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शाहिद कपूर, क्रिती सेनन आणि रश्मिका मंदाना आगामी 'कॉकटेल २'मध्ये दिसणार आहेत. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचं शूट परदेशात झालं. तर या महिन्यात सिनेमाची टीम दिल्ली येथे शूट करणार होती. दिल्लीतील प्रदूषण पाहता टीमने त्यासंदर्भातही सेटवर काळजी घेतली होती. मात्र अचानक दिल्ली स्फोटाने हादरली. यामुळे सिनेमाचं शूटही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शाहिद, क्रिती आणि रश्मिका यांनी सिनेमाचं युरोप शेड्युल पूर्ण केलं होतं. तिघांचे युरोपमधील काही फोटोही लीक झाले होते. 'कॉकटेल' सिनेमात शाहिद क्रिती आणि रश्मिका दोघींसोबत रोमान्स करणार आहे. या त्रिकुटाला पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. ११ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत दिल्ली आणि जवळपासच्या भागात सिनेमाचं शूट होणार होतं. आता ते ढकलण्यात असून परिस्थिती निवळल्यावर मेकर्स पुढील निर्णय घेणार आहेत.
'कॉकटेल' हा सिनेमा २०१२ साली आला होता. यामध्ये सैफ अली खान, दीपिका पादुकोण आणि डायना पेंटी होते. तिघांची केमिस्ट्री, सिनेमातील गाणी सगळंच खूप गाजलं. आता १३ वर्षांनी 'कॉकटेल २'ची तयारी सुरु झाली आहे. दिग्दर्शक होमी अदाजानिया हेच दुसऱ्या भागाचंही दिग्दर्शन करणार आहेत. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.