'धुरंधर'च्या यशावर 'नॅशनल क्रश' सारा अर्जुनची पहिली प्रतिक्रिया, प्रेक्षकांचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 15:10 IST2026-01-04T15:04:29+5:302026-01-04T15:10:12+5:30
'धुरंधर'चा जगभरात डंका! मोडले 'पठाण-जवान'चे रेकॉर्ड; अभिनेत्री सारा अर्जुन झाली भावुक

'धुरंधर'च्या यशावर 'नॅशनल क्रश' सारा अर्जुनची पहिली प्रतिक्रिया, प्रेक्षकांचे मानले आभार
भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची चर्चा आहे, तो म्हणजे आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जगभरात १२०० कोटी टप्पा ओलांडत 'धुरंधर' आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने 'जवान', 'पठाण' आणि 'छावा' सारख्या मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.
साडेतीन तासांच्या या चित्रपटाला मिळालेलं यश पाहून अभिनेत्री सारा अर्जुन भारावून गेली. बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या साराचा मुख्य अभिनेत्री म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी तिने आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे यशाचे शिखर गाठले आहे. चित्रपटाच्या यशाचे सर्व श्रेय साराने प्रेक्षकांना दिले आहे.
साराने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर करत म्हटलं की, "असं बोललं जातं की आताच्या प्रेक्षकांकडे दीर्घ कथा पाहण्यासाठी संयम राहिलेला नाही, पण तुम्ही ते चुकीचं सिद्ध केलं. तुम्ही सर्वांना प्रेक्षकांची खरी शक्ती काय असते, याची आठवण करून दिली आहे".
ती पुढे म्हणाली, "कलाकार आणि निर्माते म्हणून आम्ही प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकतो, पण प्रेक्षकांवर आमचे नियंत्रण नसते आणि हेच या क्षेत्राचे सौंदर्य आहे. जेव्हा प्रेक्षकांशी एक भावनिक नातं जुळतं, तेव्हा ती भावना जगातील सर्वात समाधानकारक असते".
चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सारा म्हणाली की, "तुमच्याकडून मिळालेलं हे प्रेम, धैर्य आणि करुणा पाहून माझं मन कृतज्ञतेने भरून गेले आहे. देवासमोर आणि तुमच्यासमोर मी मनापासून आभार मानत, नम्रपणे मस्तक झुकवते. मी नुकतीच सुरुवात करत आहे. ज्या चित्रपटाचा मी भाग आहे तसेच जे काम मी करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी इतक्या लवकर असा पाठिंबा मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी बळ मिळालं आहे".
सारानं पोस्टच्या शेवटी चित्रपटाच्या यशाचं श्रेय निर्मात्यांना दिलं आणि या चित्रपटाचा भाग बनल्याचा आनंद व्यक्त केला. तसंच, चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्या वतीने तिने 'धुरंधर'साठी चाहत्यांचे आभार मानले आणि सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.