रितेश-जिनिलिया देशमुख खऱ्या आयुष्यात कसे? मराठी अभिनेत्याने सेटवरचा 'तो' अनुभव केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:08 IST2026-01-08T12:06:57+5:302026-01-08T12:08:04+5:30
रितेश आणि जिनिलिया यांचा जगभराच चाहतावर्ग आहे. या जोडीला महाराष्ट्रात प्रेमाने 'महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी' म्हणून ओळखले जाते.

रितेश-जिनिलिया देशमुख खऱ्या आयुष्यात कसे? मराठी अभिनेत्याने सेटवरचा 'तो' अनुभव केला शेअर
चित्रपटसृष्टीत यश मिळाल्यावर अनेक कलाकारांचे पाय जमिनीवर राहत नाहीत, असे म्हटले जाते. मात्र, याला अपवाद ठरलेलं नाव म्हणजे रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख. रितेश आणि जिनिलिया यांचा जगभराच चाहतावर्ग आहे. या जोडीला महाराष्ट्रात प्रेमाने 'महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी' म्हणून ओळखले जाते. नुकतंच रितेश-जिनिलिया यांच्याबद्दल प्रसिद्ध मराठी अभिनेता संजय खापरेनं मोठा खुलासा केला आहे.
'लय भारी' सिनेमाच्या आठवणींना उजाळा देताना संजय खापरेनं रितेश आणि जिनिलिया देशमुख हे खऱ्या आयुष्यात कसे आहेत? रितेश सेटवर सहकलाकारांशी कसा वागतो? याबद्दल खुलासा केला. संजय खापरे म्हणाला, "मी रितेशबरोबर 'लय भारी' सिनेमाच्या निमित्ताने काम केलं होतं. इतका मोठा माणूस, एवढा मोठा फॅनबेस आणि बॉलिवूडमध्येही त्यांचं मोठं नाव आहे. पण, तो माणूस सेटवर प्रत्येकाशी आदराने बोलतो. लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला 'अहो-जाओ' अशी आदराने हाक मारतो. मला या साधेपणाचं फार कौतुक वाटतं".
रितेशसोबतच संजय खापरेनं जिनिलिया देशमुखच्या स्वभावाबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, "मला अजूनही आठवतंय, जेव्हा शूटिंग सुरू होतं, तेव्हा जिनिलिया आमच्यासाठी घरची बिर्याणी आणि बरंच काय-काय बनवून घेऊन सेटर येत. सेटवरच्या लोकांसाठी स्वतःच्या घरून जेवण आणणं, हे पाहून मी फार भारावून गेलो होतो. ही माणसं किती कौटुंबिक आहेत, याची प्रचिती मला तेव्हा आली. आपल्याला वाटतं हे लोक मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जात असतील. पण, असं नाही. ते लोक फार साधं-सोपं आयुष्य जगत आहेत. ही खरंच आपण सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे", असं संजय खापरेने रितेश-जिनिलियाचं कौतुक करत सांगितलं.