"मला पॅनिक ॲटॅक आला...", घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने पाहिला कठीण काळ, फराह खानने दिली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:15 IST2025-11-13T15:14:33+5:302025-11-13T15:15:15+5:30
सिंगल मदर म्हणून फराह खानने सानियाचं केलं कौतुक

"मला पॅनिक ॲटॅक आला...", घटस्फोटानंतर सानिया मिर्झाने पाहिला कठीण काळ, फराह खानने दिली साथ
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि बॉलिवूड कोरिओग्राफर, दिग्दर्शिका फराह खान एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. सानिया मिर्झाचा दोन वर्षांपूर्वी पती शोएब मलिकसोबत घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा खूप कठीण काळातून जात होती. तेव्हा फराह खानचाच तिला आधार मिळाला होता. सानियाने आपल्या युट्यूब चॅनलवरील टॉकशोमध्ये याबाबत खुलासा केला.
सानिया मिर्झाने 'सर्व्हिंग इट अप विद सानिया' हे युट्यूब चॅनल सुरु केलं आहे. यामध्ये ती वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा करणार आहे. तिच्या पहिल्याच एपिसोडमध्ये तिची खास मैत्रीण फराह खानने हजेरी लावली. यावेळी सानिया म्हणाली, "मला कॅमेऱ्यासमोर याबद्दल बोलायचं नाही पण एक वेळ अशी होती जी माझ्यासाठी अत्यंत वाईट होती. फराह माझ्या सेटवर आली आणि त्यानंतर मला एका लाइव्ह शोला जायचं होतं. फराह मला म्हणालेली की, 'काहीही झालं तरी तू हा शो करत आहेस".
फराह खान त्या दिवसाची आठवण काढत म्हणाली, "मी तेव्हा सानियाला पाहून खूप घाबरले होते. तिला पॅनिक अटॅक आल्याचं मी कधीच बघितलं नव्हतं. मला त्या दिवशी शूट करायचं होतं. पण मी सगळं सोडून पजामा आणि चप्पल घालून तिच्याकडे पोहोचले. मला त्याक्षणी माझ्या मैत्रिणीजवळ थांबायचं होतं." या शोमध्ये फराह खानने सानियाचं कौतुकही केलं. सगळं एकट्याने करण्यासाठी खूप मेहनत लागते. मुलाला वाढवायचं, त्याला वेळ द्यायचा, त्याच्यावर संस्कार करायचे हे गरजेचं असतं. यासाठी दुप्पट मेहनत लागते आणि सानिया ते अगदी हुशारीने करत आहे असंही फराह म्हणाली.
सानिया मिर्झाने २०१० साली पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केलं होतं. हे लग्न तेव्हा खूप चर्चेचा विषय ठरलं होतं. २०१८ साली त्यांना मुलगा झाला. नंतर शोएबचे विवाहबाह्य संबंध समोर आले आणि सानियाने २०२३ साली त्याला घटस्फोट दिला.