मृत्यूपूर्वी काजोलच्या वडिलांनी सलमानकडे केलेली 'ही' मागणी; अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:37 IST2025-09-26T12:34:32+5:302025-09-26T12:37:54+5:30
सलमानचे अभिनेत्रीी काजोलच्या वडिलांशी चांगले संबंध होते. मृत्यूपूर्वी काजोलच्या वडिलांनी सलमानकडे खास मागणी केली होती.

मृत्यूपूर्वी काजोलच्या वडिलांनी सलमानकडे केलेली 'ही' मागणी; अभिनेत्याने पहिल्यांदाच केला खुलासा
अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या बहुचर्चित 'टू मच' (T0o Much) या चॅट शोची नुकतीच सुरुवात झाली. या शोमध्ये पहिले पाहुणे म्हणून अभिनेता सलमान खान आणि आमिर खान सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सलमान खानने एक अत्यंत भावनिक आठवण शेअर केली. त्याने काजोलचे दिवंगत वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी यांच्यासोबत झालेल्या शेवटच्या भेटीचा खुलासा केला. जेव्हा शोमू यांनी सलमानकडे एक इच्छा व्यक्त केली होती.
शोमू मुखर्जींसोबतचे जवळचे नाते
सलमान खानने शोमू मुखर्जींसोबतच्या आपल्या संबंधांबद्दल बोलताना सांगितलं की, "काजोलचे वडील आणि मी खूप जवळ होतो. आमचे खूप चांगले संबंध होते. ते आठवड्यातून किमान दोनदा आमच्या घरी यायचे. खरं तर, त्यांच्या निधनाच्या अगदी दोन दिवस आधी, ते आमच्या घरी आले होते. नेहमीप्रमाणेच लुंगी घालून त्यांनी आपुलकीने आमची भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यावेळी ते आजारपणातून जात होते."
सलमान पुढे म्हणाला, "शोमू दा मला म्हणाले, 'यार, एक ड्रिंक पाज मला. मी त्यांना म्हणालो, 'नाही, शोमू दा, मी तुम्हाला ड्रिंक देऊ शकत नाही' पण त्यांनी आग्रह धरला. मला म्हणाले 'मी काही दिवसांत जगाचा निरोप घेणार आहे. एक पाज ना.' मला काय करावं कळेना. त्यांनी पुन्हा आग्रह केला, 'पाज यार.' म्हणून मी त्यांच्यासाठी एक ड्रिंक बनवली आणि दोन दिवसांनंतर त्यांचं निधन झालं."
सलमान खानने शोमू मुखर्जी यांच्या शेवटच्या भेटीची ही भावुक कहाणी सर्वांना सांगितली. शोमू मुखर्जी यांचे २००८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या निधनापूर्वी दोन दिवसांपूर्वीची आठवण सांगताना सलमान भावूक झाला. काजोलही वडिलांच्या आठवणी पुन्हा जागवल्याने भावुक झालेली दिसली.