सलमान खानने शेअर केला 'ति'च्यासोबतचा खास फोटो, नेटकरी म्हणाले, 'लग्न कधी केलं..?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 13:42 IST2023-10-08T13:36:31+5:302023-10-08T13:42:14+5:30
सलमान खानने लग्न केलं? नेटकऱ्यांना पडले भलतेच प्रश्न

सलमान खानने शेअर केला 'ति'च्यासोबतचा खास फोटो, नेटकरी म्हणाले, 'लग्न कधी केलं..?'
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) नेहमीच एक प्रश्न हमखास विचारला जातो. ते म्हणजे लग्न कधी करणार? आणि सलमान कधीही या प्रश्नाचं सरळ उत्तर देत नाही. सध्या 'टायगर 3'मुळे चर्चेत असलेल्या सलमानने एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तो चक्क एका मुलीसोबत रोमँटिक पोजमध्ये दिसत आहे. मुलीचा पाठमोरा फोटो असल्याने ती नेमकी कोण आहे हे काही स्पष्ट होत नाही. या फोटोवरुन चाहत्यांनी मात्र वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.
सलमानने खानने काही वेळापूर्वीच सोशल मीडियावर फोटो शेअर केलाय. यामध्ये त्याने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट, त्यावर पांढरंच जॅकेट आणि पांढरी पँट घातली आहे. तर बाजूला एक मुलगी असून ती पाठमोरी उभी आहे. दोघंही एकमेकांना टेकून उभे आहेत. विशेष म्हणजे त्या मुलीच्या जॅकेटवर मागे 27/12 ही तारीख दिसत आहे. तसंच सलमानने फोटोवर उद्या काहीतरी खास घेऊन येतोय असंही लिहिलं आहे.त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे.
सलमानसोबत ती मुलगी नक्की कोण आहे हे बहुतेक उद्याच कळेल. शिवाय 27/12 ही खरं तर सलमानची जन्मतारीख आहे. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाचं काही कनेक्शन आहे असं दिसतंय. मात्र उद्या नक्की सलमान काय सरप्राईज उलगडतोय याबाबत चाहते अंदाज बांधत आहे. अनेकांनी 'लग्न केलं का','भाभी मिल गयी' अशा कमेंट्सही केल्या आहेत.
सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री लवकरच बॉलिवूड डेब्यू करत आहे. तिचा 'फर्रे' हा सिनेमा येत आहे. त्याचं टीझर अनेकांना आवडलं आहे. फोटोतील ती मुलगी अलिझेह असल्याच्याही चर्चा आहेत. आता खरं काय ते उद्याच कळेल.