अखेर सलमान खान लग्न करणार? इन्स्टा पोस्टमधून दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:35 IST2025-07-09T11:29:48+5:302025-07-09T11:35:50+5:30
सलमान खानची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

अखेर सलमान खान लग्न करणार? इन्स्टा पोस्टमधून दिले संकेत
Salman Khan Marriage: बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' अर्थात अभिनेता सलमान खानलग्न कधी करणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. सलमानला याविषयी अनेकदा प्रश्न विचारला गेला, मात्र त्याने कधीच ठोस उत्तर दिलं नाही.
गेल्या अनेक दशकांपासून तो बॉलिवूडवर अधिराज्य गाजवतोय. पण, सलमान खासगी आयुष्यात अजूनही सेटल नाहीये. वयाच्या ५९ व्या वर्षीही तो अजूनही अविवाहितच आहे. सलमाननं लग्न करावं अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. आता अखेरीस सलमान यानं लग्न करण्यासाठी मनाची तयारी केल्याची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. या चर्चांना त्याची इन्स्टाग्राम पोस्ट कारण ठरली आहे.
सलमान खान याने नुकतंच इन्स्टाग्रामवर त्याचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सलमाननं अतुल याचा पत्नी अलवीरा खानच्या खांद्यावर झोपलेला फोटो शेअर केलाय. या फोटोसोबत त्यानं लिहलं, "माझ्या प्रिय मेहुण्या वाढदिवसाच्या शुभेच्छा... माझ्या बहिणीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. तू सर्वोत्तम वडील आणि पती आहेस. तू पुन्हा तोच माणूस बनू शकतोस का, जो मला माहित होता, एक दिवस मीही तुझ्यासारखाच माणूस होईन. जागा हो...", असं सलमाननं म्हटलं. या पोस्टमधील "एक दिवस मीही तुझ्यासारखाच माणूस होईन" या ओळींवरून सलमान आता लग्न करण्यासाठी तयार असल्याचा अंदाज त्याच्या चाहत्यांनी बांधला आहे. त्यामुळे सलमान खानच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
सलमानचे नाव याआधी ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, जरीन खान यांच्याशी जोडले गेले आहे, मात्र त्याचे लग्न कधीच झाले नाही. सध्या सलमान हा यूलिया वंतूर हिला डेट करतोय. सलमानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'बॅटल ऑफ गालवान' या चित्रपटात दिसणार आहे. २०२० मधील भारत-चीन संघर्षावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी सलमानने सैनिकी प्रशिक्षणही घेतले आहे. सलमान खान या चित्रपटात कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहेत. कर्नल संतोष बाबू यांनी या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली होती.