'धुरंधर: द रिव्हेंज'मधील जमील जमालीला पाहून सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड, म्हणाला, "राकेशजी, काय षटकार मारलात"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 11:08 IST2026-04-06T11:07:21+5:302026-04-06T11:08:09+5:30
नुकतंच सचिन तेंडुलकरनं 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहिला आणि लगेचच राकेश बेदी यांना फोन केला.

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील जमील जमालीला पाहून सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड, म्हणाला, "राकेशजी, काय षटकार मारलात"
'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन विक्रम मोडत आहे. आदित्य धर दिग्दर्शित सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी 'जमील जमाली' नावाच्या एका पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. त्यांचा 'बच्चा है तू मेरा' हा डायलॉगही प्रचंड गाजला असून त्यावर असंख्य मीम्स तयार झाले आहेत. दोन्ही भागांमधील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा करताना चाहते थकत नाहीयेत. आता थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंराकेश बेदी यांचं कौतुक केले आहे. याचा खुलासा खुद्द राकेश बेदी यांनीच केला आहे.
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी सांगितले की, चित्रपट पाहिल्यानंतर अनेक लोकांनी कामाचं कौतुक करण्यासाठी फोन केले. पण, जो एक फोन खास ठरला, तो दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा होता. राकेश यांना फोन करत सचिन म्हणाला, "राकेशजी, चित्रपट पाहून खूप मजा आली! काय षटकार मारला आहे तुम्ही!" त्यावर राकेश बेदींनीही मिश्किलपणे उत्तर देत म्हटलं, "तुम्ही तर क्रिकेटच्या मैदानात अनेक षटकार मारले आहेत, पण तुमचे षटकार भारतात पडले; माझा हा षटकार मात्र थेट पाकिस्तानात पडला आहे".
क्लायमॅक्समध्ये मोठा ट्विस्ट
राकेश बेदी यांच्या भूमिकेची कॉमिक टाइमिंग जबरदस्त असली, तरी 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या क्लायमॅक्समध्ये त्यांच्या पात्राबाबतचं उघड होणारं रहस्य प्रेक्षकांना थक्क करणारे आहे. दरम्यान, राकेश बेदी यांच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर ते वरुण धवनच्या आगामी 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमात राकेश बेदी दिसणार आहेत. तसंच प्राईम व्हिडीओवरील 'राख' या आगामी सीरिजमध्येही त्यांची भूमिका आहे. दोन्ही प्रोजेक्ट्सचं शूट जवळपास पूर्ण झालं असून लवकरच रिलीज होणार आहेत.