आर्यन खानच्या दिग्दर्शनावर रितेश देशमुख फिदा, शाहरुखला पोस्ट टॅग करत म्हणाला "हा किती अभिमानाचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:36 IST2025-08-21T14:36:14+5:302025-08-21T14:36:57+5:30

रितेश देशमुख याने शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Riteish Deshmukh hails Aryan Khan directorial debut Bads of Bollywood Netflix web series | आर्यन खानच्या दिग्दर्शनावर रितेश देशमुख फिदा, शाहरुखला पोस्ट टॅग करत म्हणाला "हा किती अभिमानाचा..."

आर्यन खानच्या दिग्दर्शनावर रितेश देशमुख फिदा, शाहरुखला पोस्ट टॅग करत म्हणाला "हा किती अभिमानाचा..."

आर्यन खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा. आर्यनच्या पहिल्या-वहिल्या बहुचर्चित सीरिजचा प्रीव्ह्यू लाँच सोहळा काल पार पडला. लेकाच्या पदार्पणानिमित्त शाहरुख खान स्वतः त्याच्या चाहत्यांसमोर, प्रेक्षकांसमोर आणि माध्यमांसमोर उपस्थित होता. आर्यनची ही वेब सिरीज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' (Bads of Bollywood) या नावाने लवकरच प्रदर्शित होणार आहे. आर्यन खानने या सीरिजमधून दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या सीरिजच्या प्रीव्ह्यूला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आर्यनच्या पहिल्या प्रोजेक्टला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांकडून शुभेच्छा मिळत आहेत. अभिनेता रितेश देशमुख याने शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्यन खानच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रोजेक्ट "बॅड्स ऑफ बॉलिवूड" या शोचा प्रीव्ह्यू नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा प्रीव्ह्यू पाहून रितेश देशमुखने आपल्या भावना इन्स्टाग्रामवर व्यक्त केल्या आहेत. रितेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा प्रीव्ह्यू शेअर करत आर्यन खानला टॅग केले आणि लिहिले, "प्रिय आर्यन, दिग्दर्शक म्हणून तुझे हे पदार्पण हे तुझ्या सुंदर प्रवासाची सुरुवात आहे.  तुझ्या कथांमध्ये तुझे हृदय, तुझे दृष्टिकोन आणि तुझे धैर्य दिसून येऊ दे. तुला अनंत सर्जनशीलता आणि यश मिळो ही शुभेच्छा! जग तुझ्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी तयार आहे".

यासोबतच, रितेशने शाहरुख खान आणि गौरी खान यांना टॅग करत "हा किती अभिमानाचा क्षण आहे" असे म्हटले. त्याने "द बॅड्स ऑफ बॉलीवूड" हा शो नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. तसेच त्याने नेटफ्लिक्स इंडिया, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' येत्या १८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये लक्ष्य, मोना सिंह आणि  बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय बॉलिवूडमधील इतर अनेक स्टार्स यामध्ये कॅमिओ करणार आहेत. 'किल'नंतर लक्ष्य आणि राघव जुयाल एकत्र दिसत आहेत. आता सीरिजच्या रिलीजची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. 

Web Title: Riteish Deshmukh hails Aryan Khan directorial debut Bads of Bollywood Netflix web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.