मृत्यूच्या अवघ्या ३ महिने आधी ऋषी कपूर यांनी पाहिलेलं 'ते' स्वप्न; ६ वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी केलं पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:41 IST2026-01-27T11:36:28+5:302026-01-27T11:41:45+5:30
ऋषी कपूर यांचं स्वप्न पूर्ण! मृत्यूच्या ३ महिन्यांपूर्वी मोदी सरकारला केली होती कळकळीची विनंती

मृत्यूच्या अवघ्या ३ महिने आधी ऋषी कपूर यांनी पाहिलेलं 'ते' स्वप्न; ६ वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी केलं पूर्ण!
Republic Day 2026 Parade Represent Indian Cinema : २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. कर्तव्य पथावरील खास कार्यक्रमासाठी राजधानीत देशभरातील नागरिक पोहोचले आहेत. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाने संजय लीला भन्साळी यांच्या सहकार्याने 'भारत गाथा' या संकल्पनेवर आधारित विशेष चित्ररथ सादर केला. भारतीय सिनेमासाठी राष्ट्रीय व्यासपीठावरचा हा एक मोठा आणि ऐतिहासिक क्षण तर ठरलाच. पण, सोबतच याद्वारे सहा वर्षांपूर्वी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी पाहिलेलं स्वप्नही पुर्ण झालं.
२६ जानेवारी २०२० रोजी, आपल्या निधनाच्या अवघ्या तीन महिने आधी, ऋषी कपूर यांनी 'एक्स' (पुर्वीचे ट्विटर) वर मोदी सरकारला एक कळकळीची विनंती केली होती. त्यांनी लिहिले होते, "मी भारत सरकारला विनंती करतो की भारतीय चित्रपट उद्योगाला समर्पित एक मोठा चित्ररथ आयोजित करावा. जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगातील कलाकारांनी परेड आणि मार्च पास्टचा भाग असावे. जगाने आपले सामर्थ्य पाहावे. आपण सर्वांना भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय हिंद!".
I request the Indian government to dedicate a major”float”to the the Indian Film industry (which is now the largest in the world) All artistes would be part of the Parade and March past. The world must see our participation too. We are all proud “Desis” Next year. Jai Hind! 🇮🇳 🙏
— Rishi Kapoor (@chintskap) January 25, 2020
ऋषी कपूर यांनी ही सूचना केली, तेव्हा त्यांना सोशल मीडियावर प्रचंड टीकेचा सामना करावा लागला होता. "सैनिक हे खरे हिरो आहेत, त्यांची तुलना 'रील हिरों'शी करू नका", "बॉलिवूड माफिया संस्कृती नष्ट करत आहे", अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले होते. मात्र, सहा वर्षांनंतर मोदी सरकारकडून भारतीय चित्रपटांचा 'भारत गाथा' चित्ररथ सादर करण्यात आला आणि ऋषी कपूर यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण झाल्यासारखं त्यांच्या चाहत्यांना वाटलं.

जगभरात भारतीय सिनेमाचा दबदबा
भारतात दरवर्षी सरासरी १५०० हून अधिक चित्रपट तयार होतात. केवळ हिंदीच नव्हे तर तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि मराठी भाषांमध्येही मोठ्या प्रमाणात चित्रपट बनतात. हा आकडा अमेरिका आणि चीनपेक्षा जास्त आहे. म्हणूनच आज भारतीय चित्रपट भारतापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर रशिया, चीन, जपान आणि अमेरिका अशा देशांमध्येही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.