"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:58 IST2025-12-28T13:57:36+5:302025-12-28T13:58:12+5:30
'धुरंधर' पाहिल्यानंतर रहमान डकैतच्या पाकिस्तानातील मित्राने प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...
आदित्य धरचा 'धुरंधर' सिनेमा केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानातही गाजत आहे. या सिनेमातील अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होते आहे. रहमान डकैत हा पाकिस्तानातील कराचीमधील कुख्यात गँगस्टर होता. भारतातील दहशतवादी कारवायांमध्येही त्याचा हात होता. डकैतच्या गँगमध्ये सामील होत त्याच्या कुरघोड्यांची माहिती भारताला पुरवणाऱ्या भारतीय गुप्तहेराची कहाणी 'धुरंधर'मधून दाखवण्यात आली आहे. 'धुरंधर' पाहिल्यानंतर रहमान डकैतच्या पाकिस्तानातील मित्राने प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
रहमान डकैतचा वकील मित्र हबिब जान बलोच या व्हिडीओत म्हणतो की "मी दोन वेळा धुरंधर सिनेमा पाहिला आणि खूप चांगला चित्रपट बनवला आहे. त्यातील भूमिकांबद्दल आपण नको बोलूया. कारण सिनेमांमध्ये असंच दाखवलं जातं. आणखी एक-दोन गाणी असती तर अजून मजा आली असती. पाकिस्तानला हे कधी दाखवता आलं नाही. पण, भारताच्या बॉलिवूडने करून दाखवलं. धन्यवाद बॉलिवूड. रहमान डकैत हिरो होता. तो अतिशय चांगला व्यक्ती होता. रहमान डकैतचे पाकिस्तानावर उपकार आहेत. रहमान आणि उजैर बलोच नसते तर पाकिस्तानची अवस्था ही आज बांगलादेशासारखी असती किंवा त्याहूनही वाईट असती.
पाकिस्तानातील पीपुल्स पार्टीने 'धुरंधर'वर टीका करत हा सिनेमा त्यांची निगेटिव्ह बाजू दाखवल्याचं म्हटलं होतं. पण रहमान डकैतच्या मित्राने हा सिनेमा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात दाखवलेला नाही, असं म्हटलं आहे. २ दशकांपूर्वी म्हणजे जवळपास वीस वर्षांपूर्वी रहमान डकैत आणि त्याच्या या वकील मित्राची मैत्री होती.
'धुरंधर' सिनेमा ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होऊन २३ दिवस झाल्यानंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ठाण मांडून बसला आहे. 'धुरंधर' सिनेमात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाने १००० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.