'दुनिया हसीनो का मेला' गाण्यातील खरी डान्सर कोण? २८ वर्षांपासून आहे इंडस्ट्रीतून गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 12:00 IST2025-09-26T11:59:38+5:302025-09-26T12:00:19+5:30
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मुळे दुनिया हसीनो का मेला हे गाणं चर्चेत आलं. त्यामुळे या गाण्यात झळकलेल्या मूळ अभिनेत्रीची चर्चा आहे

'दुनिया हसीनो का मेला' गाण्यातील खरी डान्सर कोण? २८ वर्षांपासून आहे इंडस्ट्रीतून गायब
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजमुळे एक जुनं गाणं अचानक ट्रेंडिंगवर आलं. ते गाणं म्हणजे 'दुनिया हसीनों का मेला'. बॉबी देओलवर चित्रित झालेलं हे गाणं आर्यन खानने वेबसीरिजमध्ये हुशारीने वापरलं आणि सर्वत्र या गाण्याची चर्चा रंगली. वेबसीरिजमध्ये या गाण्यात मोना सिंग दिसली. पण खऱ्या गाण्यात मात्र गाण्यात एक वेगळीच अभिनेत्री झळकली होती. त्यामुळे ही अभिनेत्री कोण? अशी सर्वत्र चर्चा झाली. जाणून घ्या तिच्याबद्दल
'दुनिया हसीनों का मेला' गाण्यातील 'ती' कोण?
९० च्या दशकात 'दुनिया हसीनों का मेला' या सुपरहिट गाण्यात डान्सर भानू खान झळकली होती. या गाण्याचे कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी झूमला दिलेल्या मुलाखतीत भानू खानसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
चिन्नी प्रकाश यांनी सांगितलं की, गाणं अधिक चांगलं करण्यासाठी आणि गाण्याला एक अनोखं रुप देण्यासाठी तितक्याच आकर्षक दिसणाऱ्या व्यक्तीची गरज होती. ते म्हणाले, "गाण्याला उत्तम बनवण्यासाठी, तुम्हाला अशा व्यक्तीची गरज असते जी खूप आकर्षक असेल. तुम्ही जेव्हा एखादा शॉट घेता, तेव्हा त्यात एक सुंदर चेहरा असणं आवश्यक आहे." याच कारणामुळे त्यांनी बॉबी देओलसोबत त्या गाण्यात भानू खानला घेतलं होतं.
कोण होती भानू खान?
भानू खान ही ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर होती. ती आमिर खान सोबत 'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील 'तेरे इश्क में नाचेंगे' या गाण्यातही दिसली होती. याशिवाय ती 'राम कसम मेरा बड़ा नाम हो गया', 'गुटर गुटर', आणि 'दूध बन जाऊंगी मलाई बन जाऊंगी' यांसारख्या गाजलेल्या गाण्यांमध्येही झळकली होती.
चिन्नी प्रकाश यांनी भानू खानचं कौतुक करताना सांगितलं की, "ती खूप सुंदर मुलगी होती. शरीरयष्टीने नाजूक होती. याशिवाय तिला उत्तम डान्सर करता यायचा. चांगला डान्स करता येत असल्याने तिची एक वेगळी क्रेझ होती. अभिनेते, दिग्दर्शक, प्रत्येकजण तिला फ्रेममध्ये पाहू इच्छित होते. भानूला त्यावेळी खूप मागणी असल्याने ती बहुतांश चित्रपटांमध्ये दिसायची. त्यामुळेच आम्ही तिला या गाण्यात कास्ट केलं होतं." लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली भानू सध्या काय करते, कुठे आहे याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. गेल्या २८ वर्षांपासून ती इंडस्ट्रीतून गायब आहे.