रवीना टंडनने मुलांपासून लपवले नाही कोणतेच अफेअर्स, म्हणाली, 'आज नाहीतर उद्या...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 12:58 IST2023-10-01T10:32:55+5:302023-10-01T12:58:24+5:30
रवीना आपल्या मुलांसोबत जुन्या रिलेशनशिप्सविषयी खुलेपणाने बोलतेच.

रवीना टंडनने मुलांपासून लपवले नाही कोणतेच अफेअर्स, म्हणाली, 'आज नाहीतर उद्या...'
90 च्या दशकात अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tondon) बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवलं. 'मोहरा', 'अंदाज अपना अपना' असे एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देऊन तिने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तिच्या सौंदर्यावर आजही चाहते फिदा आहेत. रवीनाचं प्रोफेशनलसोबतच वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असायचं. अक्षय कुमार, अजय देवगणसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. आपलं कोणतंच जुनं रिलेशनशिप मुलांपासून लपवलं नाही असा खुलासा नुकताच रवीनाने केला आहे.
रवीना आपल्या मुलांसोबत जुन्या रिलेशनशिप्सविषयी खुलेपणाने बोलतेच. तिने बऱ्याच वर्षांपूर्वी छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. नंतर तिने उद्योजक अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तिने मुलगी राशा आणि मुलगा रणबीरवर्धन दोघांना जन्म दिला. मुलाखतीत रवीना म्हणाली,'माझ्या मुलांसाठी ही खुली किताब आहे. आज नाहीतर उद्या याबद्दल ते कुठे वाचतील आणि असंही होऊ शकतं की यापेक्षा वाईट शब्दात लिहिलेलं वाचतील. कारण आपल्याला माहितच आहे ९० च्या दशकात मीडिया कशी होती. येलो जर्नलिझम पीकवर होतं. त्यांच्यात काहीच नैतिकता नव्हती.'
ती पुढे म्हणाली,'आता सोशल मीडियामुळे सगळंच बदललं आहे. आता सेलिब्रिटी आपलं म्हणणं स्वत:हून मांडू शकतात. पण आधी असं नव्हतं करता येत. ते संपादकांच्या दयेवर अवलंबून असायचे. तेव्हाच्या काळी मॅगजीन्स माझ्याबद्दल फार वाईट छापायची. माझं नाव घेऊन मला बदनाम केलं जायचं. मी तेव्हाही अनेकदा मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.'
रवीनाच्या रिलेशनशिपविषयी सांगायचं तर १९९५ साली तिने 'मोहरा' सिनेमात अक्षय कुमारसोबत काम केलं होतं. तेव्हापासूनच दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली.९० दशकाच्या शेवटी त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र नंतर ते वेगळे झाले. काही वर्षांनी रवीनाने अनिल थडानीसोबत लग्नगाठ बांधली.