काय म्हणता? रणवीर सिंग चित्रपटांसाठी घेणार नाही फी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 06:00 IST2019-02-22T06:00:00+5:302019-02-22T06:00:03+5:30
होय, रणवीर आता आपल्या चित्रपटांसाठी फी घेणार नसल्याचे कळतेय. धक्का बसला ना, पण हे खरे आहे.

काय म्हणता? रणवीर सिंग चित्रपटांसाठी घेणार नाही फी?
पद्मावत, सिम्बा आणि गली बॉय असे बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर रणवीर सिंगचे भाव सध्या चांगलेच वधारले आहेत. गतवर्षी रणवीरने बॉक्सआॅफिसवर सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली. आता एक ताजी खबर आहे. होय, रणवीर आता आपल्या चित्रपटांसाठी फी घेणार नसल्याचे कळतेय. धक्का बसला ना, पण हे खरे आहे. आता फी घेणार नाही तर रणवीर फुकटात काम करणार का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तसे अजिबात नाही. रणवीर फी घेणार नाही तर त्याऐवजी चित्रपटाच्या कमाईतील काही टक्के वाटा घेईल.
होय, आमिर खान, अक्षय कुमार, सलमान खानसारखे दिग्गज स्टार्स फी घेत नाहीत. तर चित्रपटाच्या कमाईतील हिस्सा घेतात. रणवीरनेही याच दिग्गजांच्या पावलावर पाऊल टाकत, फी न घेता नफ्यातील वाटा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पद्मावत या चित्रपटानंतर रणवीरने फीमध्ये मोठी वाढ केली आहे. पण आता निर्माते त्याला नफ्यातील वाटा घेण्याची गळ घालत आहे.
चर्चा खरी मानाल तर रणवीरचा आगामी चित्रपट ‘83’पासून याची सुरुवातही झाली आहे. या चित्रपटात रणवीर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटासाठी रणवीरला नफ्यातील काही टक्के वाटा मिळणार आहे. निर्मात्यांसाठी हा फायद्याचा सौदा आहे, रणवीरसाठीही असणारचं. रणवीरची ज्या पद्धतीने वाटचाल सुरु आहे, त्यावरून तरी हेच दिसतेय.
रणवीरचा अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटानेही बॉक्सआॅफिसवर धूम केली आहे. रिलीजनंतरच्या सहा दिवसांत या चित्रपटाने ८९ कोटींची कमाई केली आहे.