'धुरंधर' सिनेमात २० वर्षांनी छोट्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; रणवीर सिंग म्हणाला- "मी नशीबवान आहे की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:40 IST2025-11-18T17:38:04+5:302025-11-18T17:40:38+5:30
२० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स केल्याने रणवीर सिंग चर्चेत. आता अभिनेत्याने या विषयावर मौन सौडलंय

'धुरंधर' सिनेमात २० वर्षांनी छोट्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; रणवीर सिंग म्हणाला- "मी नशीबवान आहे की..."
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'धुरंधर' या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे जोरदार चर्चेत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या बहुप्रतिक्षित चित्रपटात रणवीर सिंगसोबतअक्षय खन्ना, आर माधवन, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांसारखे तगडे कलाकार वेगवेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. या विषयावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली असताना रणवीरने मौन सोडलंय.
रणवीर काय म्हणाला?
चित्रपटात रणवीर सिंगची जोडी अभिनेत्री सारा अर्जुन हिच्यासोबत जमली आहे. रणवीर सिंग ४० वर्षांचा आहे, तर सारा अर्जुन २० वर्षांची आहे. या दोघांच्या वयातील या मोठ्या फरकामुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत होत्या. यावर आता स्वतः रणवीर सिंगने 'धुरंधर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये साराचं कौतुक केलंय. तो म्हणाला, ''मी खूप नशीबवान आहे की मला सारासोबत काम करायला मिळालं. सारा एक अद्भुत आणि प्रतिभासंपन्न कलाकार आहे. तुम्हाला सिनेमा पाहून लवकरच कळेल.''
रणवीर पुढे म्हणाला, ''काही लोक असे असतात, ज्यांच्यात जन्मतःच टॅलेन्ट असतं. एकेकाळी डकोटा फॅनिंग हॉलिवूडमध्ये आली होती. मला वाटते, सारा, तू याच भूमिकेसाठी जन्मली आहेस आणि हजारो कलाकारांना मागे टाकून तू ही भूमिका मिळवली आहेस. सारा नवखी असली तरीही तिने जणू काही ५० चित्रपट केले आहेत, असा अभिनय केलाय. पडद्यावर मी ज्या उत्कृष्ट कलाकारांसोबत काम केले, त्यापैकी तू एक आहेस. तुझ्यामुळे मला स्वतःलाही चांगला अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी तुझे मनापासून आभार मानतो."
सारा अर्जुनने यापूर्वी केलेल्या कामाचा उल्लेख करत रणवीरने सांगितले की, "ज्या व्यक्तीवर मी खूप प्रेम करतो आणि ज्यांचा खूप आदर करतो, त्या मणिरत्नम सरांच्या चित्रपटांमध्येही तू काम केले आहेस. हा तुझा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे यावर माझा विश्वास बसत नाही. तू तुझी क्षमता दाखवली आहेस आणि आता जगाने तुला मोठ्या पडद्यावर पाहण्याची वेळ आली आहे. मी खरोखर खूप आनंदी आहे.", अशाप्रकारे रणवीरने साराचं कौतुक केलं.
'धुरंधर' चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, सारा अर्जुन यांच्याव्यतिरिक्त माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका अज्ञात घटनेचा रक्तरंजित थरार आपल्याला सिनेमात पाहता येणार आहे.