रणवीर सिंगनं आता फरहान अख्तरचा 'डॉन ३' सोडला? धुरंधर'च्या यशानंतर घेतला मोठा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:49 IST2025-12-23T15:49:26+5:302025-12-23T15:49:35+5:30
'धुरंधर'नंतर चाहत्यांना रणवीरच्या आगामी 'डॉन ३'बद्दल उत्सुकता होती.

रणवीर सिंगनं आता फरहान अख्तरचा 'डॉन ३' सोडला? धुरंधर'च्या यशानंतर घेतला मोठा निर्णय!
सध्या संपूर्ण देशात अभिनेता रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या स्पाय थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या सिनेमानं आतापर्यंत ५५० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'धुरंधर'नंतर चाहत्यांना रणवीरच्या आगामी 'डॉन ३'बद्दल उत्सुकता होती. पण, रणवीरने 'डॉन ३'मधून बाहेर होत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
पिंकव्हिलाच्या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टनुसार, रणवीर सिंगने फरहान अख्तरच्या बहुप्रतिक्षित 'डॉन ३'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 'धुरंधर'च्या यशानंतर आता रणवीरला पुन्हा तशाच धाटणीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कथांमध्ये रस उरलेला नाही, याच कारणामुळे त्याने 'डॉन ३' मधून माघार घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रणवीरला आता संजय लीला भन्साळी, लोकेश कनगराज आणि अटली यांसारख्या भव्य मांडणी करणाऱ्या दिग्दर्शकांसोबत काम करायचे आहे.
'डॉन'च्या जागी आता 'प्रलय'!
'डॉन ३' मधून बाहेर पडल्यानंतर रणवीरने आपला मोर्चा जय मेहता यांच्या 'प्रलय' या चित्रपटाकडे वळवला आहे. हा चित्रपट एक झॉम्बी-थ्रिलर असून, अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी माणूस किती टोकाला जाऊ शकतो, याचे चित्रण पाहायला मिळेल. रणवीर स्वतः या प्रोजेक्टसाठी तारखा आणि शेड्युल्स जुळवून देत असल्याने, 'प्रलय'चे शूटिंग अपेक्षेपेक्षा लवकर सुरू होणार आहे.
आता पुढचा 'डॉन' कोण?
रणवीर सिंगने माघार घेतल्यामुळे 'डॉन ३' च्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर या आयकॉनिक भूमिकेसाठी जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स असलेला अभिनेता शोधण्याचे मोठे आव्हान फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यासमोर उभे राहिले आहे.