"मुलांना सुरक्षित ठेवायचे असेल तर..." मुख्यमंत्र्यांसमोर राणी मुखर्जीने काय म्हटले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:02 IST2025-10-03T16:01:24+5:302025-10-03T16:02:01+5:30
मुंबईमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये राणी मुखर्जी सहभागी झाली.

"मुलांना सुरक्षित ठेवायचे असेल तर..." मुख्यमंत्र्यांसमोर राणी मुखर्जीने काय म्हटले?
Cyber Crime: आज गृह विभागाकडून महाराष्ट्रात 'सायबर जागरुकता महिना' साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे 'सायबर जनजागृती माह ऑक्टोबर २०२५ उदघाटन कार्यक्रम' येथे 'सायबर योद्धा' या लहान मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री राणी मुखर्जी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात राणी मुखर्जीनं आपलं मनोगत व्यक्त करताना सायबर सुरक्षेचं महत्त्व अधोरेखित केलं.
राणीने या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलचे विशेष कौतुक केले. एक चांगले डिजिटल जग निर्माण करण्यासाठी दिवसरात्र काम करणारे 'अनसंग हिरो' असा उल्लेख तिनं सायबर सेल अधिकाऱ्यांचा केला.
या कार्यक्रमात बोलताना राणी मुखर्जी म्हणाली, " या कार्यक्रमाचा भाग होणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. वर्षानुवर्षे, माझ्या चित्रपटांमधून मला अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि दुर्बलांचे रक्षण करणाऱ्या स्त्रिया साकारण्याचे भाग्य लाभले आहे. खरं तर, आज मी थेट मर्दानी 3 च्या शूटिंगवरून येथे आले आहे, त्यामुळे हा क्षण अतिशय विलक्षण वाटतो. महाराष्ट्र पोलिसांनी घेतलेली ही पुढाकार प्रशंसनीय आहे".
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मानले आभार
राणी मुखर्जीनं विशेषतः महिलांवर आणि मुलांवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांवर चिंता व्यक्त केली. ती म्हणाली, "विशेषत: महिलांवर आणि मुलांवर होणारे सायबर गुन्हे आज शांतपणे आपल्या घराघरात शिरत आहेत. एक स्त्री आणि आई म्हणून मला ठाऊक आहे की सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूकता किती महत्त्वाची आहे. जेव्हा कुटुंबांना कसे सुरक्षित राहायचे आणि मदत कुठे मिळेल हे माहित असते, तेव्हाच खरी सुरक्षा सुरू होते. या महत्त्वाच्या मोहिमेला प्राधान्य दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानते".
"या हेल्पलाइन सर्व नागरिकांसाठी वरदान"
नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन नंबरचा वापर करावा, असे आवाहन राणीने केले. ती म्हणाली, "डायल १९३० आणि डायल १९४५ या हेल्पलाइन सर्व नागरिकांसाठी वरदान आहेत". आपल्या भाषणाचा समारोप करताना अभिनेत्री म्हणाली, "चला आज आपण सगळे मिळून सतर्क राहण्याचा, आवाज उठवण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जगासाठी एकत्र उभे राहण्याचा संकल्प करूया" . दरम्यान, राणी मुखर्जीचा आगामी चित्रपट 'मर्दानी ३' येत्या २७ फेब्रुवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.