राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जी साईबाबांच्या चरणी, पतीच्या 'वॉर २'साठी केली प्रार्थना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:07 IST2025-08-12T15:44:37+5:302025-08-12T16:07:26+5:30
राणी मुखर्जीनं शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावत दर्शन घेतलं.

राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जी साईबाबांच्या चरणी, पतीच्या 'वॉर २'साठी केली प्रार्थना
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या चर्चेत आहेत. नुकतंच राणी मुखर्जीनं 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. हा तिचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाल्यानंतर राणी मुखर्जींनं शिर्डी गाठलं आणि साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाली. यावेळी तिनं यावेळी राणीसोबत तिचा भाऊ आयान मुखर्जी हा देखील उपस्थित होत्या.
राणी मुखर्जीं हिचा साई दर्शनानंतर संस्थानच्यावतीनं शाल आणि साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. साईदर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राणी मुखर्जीं म्हणाली, "साईबाबांच्या जवळ आल्यानंतर कायमच चांगलं वाटतं. साईबाबांचे बोलावणे कधी येईल याची कायम वाट पाहत असते. साईबाबांचे बोलावणे आले की, शिर्डीला येते. आता अलिकडेच मला नॅशनल अवॉर्ड मिळाला, त्यासाठी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आले".
पुढे ती म्हणाली, "माझ्या पतीचा 'वॉर २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या यशासाठीही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे. मुंबईतील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतच असते. मात्र शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेणे, हा एक वेगळाच अनुभव मिळतो. सर्वांनी एकदा तरी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे. शिर्डीत येऊन साईबाबांचे अनुभव आपल्या बरोबर घेऊन गेले पाहिजेत. हा अनुभव वर्षभर आपल्या बरोबर राहतो", असं तिनं म्हटलं. राणी मुखर्जी ही शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून वर्षातून किमान एकदा तरी ती साई दर्शनासाठी आवर्जून येते. 'मर्दानी २'च्या यशानंतर तिने शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात प्रार्थना केली होती.