'डायनिंग विथ द कपूर्स'मधून आलिया भट गायब, रणबीरच्या पत्नीला का वगळलं? काय कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 09:52 IST2025-11-20T09:35:25+5:302025-11-20T09:52:09+5:30
सून आलिया भटला 'Dining With The Kapoors' मधून का वगळण्यात आले? कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का

'डायनिंग विथ द कपूर्स'मधून आलिया भट गायब, रणबीरच्या पत्नीला का वगळलं? काय कारण?
Dining With The Kapoors: बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध कुटुंबांपैकी एक कपूर कुटुंब हे आहे. अशातच हे कपूर कुटुंब एका शोमुळे विशेष चर्चेत आले आहे. 'डायनिंग विथ द कपूर्स' हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या या सिरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर, आधार जैन, अरमान जैन आणि नव्या नवेली नंदा यांची झलक ट्रेलरमध्ये दिसली. मात्र, या कार्यक्रमाच्या ट्रेलरने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण कपूर कुटुंबाची सून असणारी अभिनेत्री आलिया भट यावेळी दिसली नाही आणि आता त्याचे कारणही समोर आले आहे.
रणबीर कपूरची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य असूनही आलिया भट या विशेष सिरीजचा भाग नसल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले होते. आता, कपूर कुटुंबातील सदस्य अरमान जैन याने बॉलिवूड हंगामासोबतच्या संभाषणात यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे. अरमान जैनने सांगितले की, आलिया भट या सिरीजसाठी उपस्थित राहू शकली नाही, कारण ती दुसऱ्या एका शूटमध्ये व्यस्त होती.
अरमानने पुढे स्पष्ट केले की, कामामुळे कुटुंबातील एखादा सदस्य मोठ्या समारंभांना उपस्थित राहू न शकणे, हे काही नवीन नाही. आलिया या शोमध्ये नसली तरीही तिने शोविषयी पोस्ट शेअर केली होती. हा कार्यक्रम नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २१ नोव्हेंबरपासून स्ट्रीम होणार आहे. राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीचे वर्ष असल्याने त्या निमित्ताने हे कुटुंब एकत्र आले आहे.