रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 10:48 IST2026-04-05T10:48:07+5:302026-04-05T10:48:31+5:30
Ramayana Movie: 'रामायण'मध्ये दिसणार बिग बींचा जावई! कोण आहे कुणाल कपूर? अमिताभ बच्चन यांच्यासोबत खास कनेक्शन

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
नितेश तिवारींचं दिग्दर्शन असलेल्या 'रामायण'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असून प्रभू श्रीरामची भूमिका साकारणार आहे. हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण'मधील प्रभू रामची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली. रणबीर कपूरला रामाच्या भूमिकेत पाहून चाहते थक्क झाले. आता सिनेमाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या 'रामायण'मध्ये बिग बींचा जावईही दिसणार आहे.
'रामायण'मध्ये अभिनेता कुणाल कपूरची एन्ट्री झाली आहे. कुणाल कपूर या सिनेमात ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कुणाल कपूर 'रामायण'मध्ये देवराज इंद्रची भूमिका साकारणार आहे. 'रामायण'मध्ये इंद्र साकारणारा कुणाल आणि रावणाच्या भूमिकेत असलेल्या यशमध्ये एक युद्धही होणार असल्याचं दाखवण्यात येणार आहे.
कोण आहे कुणाल कपूर?
कुणाल कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. आजा नचले, डॉन २, डिअर जिंदगी, बचना ए हसीनो, गोल्ड, वेलकम टू सज्जनपूर अशा सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. कुणालने नैना बच्चनसोबत लग्न केलं आहे. नैना बच्चन ही अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे. अमिताभ बच्चन यांचा छोटा भाऊ अजिताभ बच्चन आणि रमोला बच्चन यांची ती मुलगी आहे.
'रामायण'ची स्टारकास्ट
'रामायण'मध्ये रणबीर कपूर श्रीराम ही भूमिका साकारणार आहे. तर साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. रवी दुबे लक्ष्मण, अरुण गोविल राजा दशरथ, लारा दत्ता कैकयी, सनी देओल हनुमान यांच्या भूमिका साकारणार आहे. तर याशिवाय सिनेमात शिबा चड्ढा, आदिनाथ कोठारे, रकुल प्रीत सिंग, इंदिरा कृष्णन, काजल अग्रवाल हे कलाकारही दिसणार आहेत.