ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानानंतर राजश्री देशपांडेची भावुक पोस्ट; भेटीला गेल्या छाया कदम, श्रिया पिळगावकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 10:02 IST2026-03-28T10:01:05+5:302026-03-28T10:02:15+5:30
बॉलिवूड अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे.

ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानानंतर राजश्री देशपांडेची भावुक पोस्ट; भेटीला गेल्या छाया कदम, श्रिया पिळगावकर
बॉलिवूड अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. राजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली होती. स्टेज १ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याचं तिने सांगितलं आहे. सर्जरीनंतरचा हॉस्पिटलमधला फोटो शेअर करत तिने याबाबत चाहत्यांना पोस्टमधून माहिती दिली आहे. सध्या राजश्री कॅन्सरवर उपचार घेत आहे. या कठीण काळात तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत. अभिनेत्री छाया कदम आणि श्रिया पिळगावकर यांनी राजश्रीची भेट घेतली आणि तिला आधार दिला. "अनेक वेळा मी खचले, पण माझ्या मित्रांनी प्रत्येक पावलावर मला सावरलं" अशा शब्दांत तिने आपल्या जवळच्या व्यक्तींचे आभार मानले आहेत.
राजश्रीने सर्जरीनंतर काही फोटो शेअर करत भावनाही व्यक्त केल्या आहेत. तिनं लिहलं, "जेव्हा मला पहिल्यांदा माझ्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दल कळलं, तेव्हा हॉस्पिटलमधील हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट सेंटरच्या बाहेर मी एकटीच कोसळले होते.तो क्षण आजही आठवतो. नाही, मी मजबूत राहू शकले नाही. माझ्यात ताकदच नव्हती. आजही लोक विचारतात, "तुला हे कसं झालं? तू तर इतकी फिट आहेस" पण प्रामाणिकपणे सांगायचं तर माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. वेदना फक्त शारीरिक नव्हत्या, तर मानसिक आणि भावनिक वेदना असह्य होत्या. अनेक वेळा मी खचले, कधी एकटी, तर कधी माझ्या मित्रांसोबत, ज्यांनी प्रत्येक पावलावर मला आधार दिला. पण असेही अनेक दिवस होते, जेव्हा मी पुन्हा उभी राहिले आणि हार मानली नाही".
उपचारांच्या दरम्यान येणाऱ्या थकव्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "काही दिवस असे असतात, जेव्हा मला जगातील सगळी ताकद नकोशी वाटते. फक्त शांत बसावंसं वाटतं. मेरी ऑलिव्हर यांच्या कवितेतल्या त्या चिमण्यांसारखं, ज्या माझ्या खिडकीजवळच्या बोगनवेलावर बसून माझ्यासोबत सूर्योदय पाहतात. सकाळी हसतमुख उठणंही एक यश मानू शकते का? तर हो... आज मी ते साध्य केलं. मी स्वतःसाठी एक स्मित आणि एक मिठी जिंकली. आणि या प्रवासात माझ्यासोबत उभ्या असलेल्या सगळ्या लोकांचा विचार केला, ज्यांनी फोन, मेसेज आणि प्रेम दिलं. उद्या पुन्हा लढाया असतील, त्यासाठी तयारी करावी लागेल. पण आजचा दिवस फक्त प्रेमाचा असू दे". तिच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला "फायटर" म्हटले आहे.