राजकुमार रावनं पापाराझींना वाटली मिठाई; व्हायरल व्हिडीओने जिंकले चाहत्यांचे मन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:06 IST2025-12-01T11:55:31+5:302025-12-01T12:06:38+5:30
राजकुमार रावनं पापाराझींना मिठाईचे बॉक्स भेट दिले आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले.

राजकुमार रावनं पापाराझींना वाटली मिठाई; व्हायरल व्हिडीओने जिंकले चाहत्यांचे मन!
Rajkummar Rao Distributing Sweets Paparazzi: बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपं राजकुमार राव आणि पत्रलेखा आई-बाबा झाले आहेत. १५ नोव्हेंबर रोजी पत्रलेखाने गोंडस मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच मुलगी झाल्यानं आनंद द्विगुणित झाला होता. मुलीच्या जन्मानंतर १५ दिवसांनी राजकुमार रावनं पापाराझींना मिठाई वाटली. त्यानं पापाराझींना स्वतः मिठाईचे बॉक्स भेट दिले आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले.
अलीकडेच, राजकुमार रावनं एका कार्यक्रमात मुलीच्या जन्माचा आनंद पापाराझींसोबतही शेअर केला. मिठाई देताना राजकुमार राव अतिशय उत्साहाने म्हणाला की, "कमी पडली तर अजून मिठाई ऑर्डर करतो". राजकुमार रावच्या या प्रेमळ कृतीने चाहत्यांची मने जिंकली आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
प्रेमकहाणी आणि लग्न
राजकुमार राव आणि पत्रलेखाची प्रेमकहाणीही मनोरंजक आहे. राजकुमारने पहिल्यांदा पत्रलेखाला एका जाहिरातीत पाहिले आणि पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर हंसल मेहता यांच्या २०१४ च्या ड्रामा 'सिटीलाईट्स' च्या चित्रीकरणादरम्यान दोघांचे नाते अधिक घट्ट झाले. काही वर्ष डेट केल्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये, कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका खासगी समारंभात त्यांचे लग्न पार पडले. लग्नानंतर दोघेही करिअर आणि वैयक्तिक जीवनात सातत्याने यश मिळवत आहेत.