रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, उचलावे लागले हे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:27 IST2020-12-23T18:24:19+5:302020-12-23T18:27:01+5:30
सुपरस्टार रजनीकांत यांच्या देखील आगामी चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाला कोरोनाचा शिरकाव, उचलावे लागले हे पाऊल
गेली कित्येक महिने कोरोना व्हायरसने जगभर थैमान मांडले आहे. कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे अनेक महिने चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली होती. पण आता हळूहळू सगळीकडे चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सगळी खबरदारी घेऊनच चित्रीकरण केले जात आहे. पण तरीही अनेक चित्रपट, मालिकांच्या सेटवरील कलाकार, तंत्रज्ञ यांना कोरोनाची लागण होत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्या देखील आगामी चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यामुळे काही काळासाठी चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे.
एएनआयने नुकतेच याबाबत ट्वीट केले आहे. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण हैद्राबाद मध्ये सुरू आहे. या चित्रपटाच्या सेटवरील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आले आहे. रजनीकांत यांची देखील कोरोना टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. याआधी वरुण धवन, कृती सेनन, नीतू कपूर, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली होती. या सगळ्यांनीच कोरोनावर मात केली आहे.
At least seven members of actor Rajinikanth's film shooting crew test positive for #COVID19 in Hyderabad; shooting stopped: Sources
— ANI (@ANI) December 23, 2020
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने देखील नुकतेच ट्वीट करून तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले आहे. तसेच तिच्या संपर्कात आलेल्या लोकांना तिने कोरोनाची टेस्ट करून घेण्यास सांगितले आहे.