फक्त ३-४ किलो वजन वाढलं अन् मला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्सा दाखवला; राधिका आपटेचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 13:15 IST2025-12-23T13:14:24+5:302025-12-23T13:15:44+5:30
राधिकाने वजन हा मुद्दा इंडस्ट्रीत किती महत्वाचा आहे यावर भाष्य केलं.

फक्त ३-४ किलो वजन वाढलं अन् मला प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्सा दाखवला; राधिका आपटेचा खुलासा
अभिनेत्री राधिका आपटेने इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने कायम हटके सिनेमांची निवड केली आणि वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मराठी, हिंदी आणि आता हॉलिवूडमध्येही तिचं अस्तित्व आहे. राधिकाने काही वर्षांपूर्वी व्हायोलिनिस्ट बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं आणि ती लंडनमध्ये स्थायिक झाली. गेल्याच वर्षी तिने मुलीला जन्म दिला. राधिका काम असेल तेव्हा भारतात येते आणि नंतर लंडनला जाते. सध्या ती 'साली मोहोब्बत' आणि 'रात अकेली है' या दोन सिनेमांमुळे चर्चेत आहे. नुकतंच राधिकाने वजन हा मुद्दा इंडस्ट्रीत किती महत्वाचा आहे यावर भाष्य केलं. केवळ ३-४ किलो वजन वाढल्याने तिला एका मोठ्या प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत राधिका आपटे म्हणाली, "वजन वाढलं की कधी कधी मला खरंच याचा विचार करुन खूप त्रास होतो. वजन कमी जास्त होणं, सूज येणं, अशा गोष्टींचा नक्कीच माझ्यावर परिणाम होतो. मी खोटं बोलणार नाही. वजन वाढलं की मला आता लवकरच कमी करावं लागेल असाच विचार मी सतत करत असते. नुकतीच मी एका थेरपिस्टकडेही गेले होते. कारण हे जे वेट इश्यू आहे याबद्दल मी खूप ओव्हरथिंक करते. वजन लवकर कमी करावं लागेल हेच माझ्या डोक्यात असतं. मला कधीच ही अडचण नव्हती. मी नॅचरल ब्यूटीवर विश्वास ठेवते. तरी मला वजन वाढीचा एवढा फरक का पडतोय असं मला वाटायचं. म्हणूनच मी थेरपी घेतली."
मोठा प्रोजेक्ट गमावला
ती पुढे म्हणाली, "मला एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर आली होती. माझ्यासाठीच तो लिहिला होता. मी तेव्हा लंडनमध्ये डान्स शिकत होते. मी त्यांना सांगितलं होतं की मी ट्रीपवर जात आहे. तेव्हा मी कोणत्याही डाएटवर नसेन. त्यामुळे मी परत येईन तेव्हा माझं कदाचित थोडं वजन वाढलेलं असेल. पण मी आल्यावर ते कमीही करेन. मी एक डान्सर आहे माझं वय पाहता माझं मेटाबॉलिझमही सहज होतं. तसंही आपल्या हातात ३-४ महिने आणखी असणार आहेत. मी परत आले आणि ते एकदम ओरडलेच. त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली, माझं फोटोशूट केलं आणि ते म्हणाले की तुझं वजन खूप वाढलं आहे. त्याक्षणी त्यांनी मला प्रोजेक्टमधून काढूनही टाकलं. तो सिनेमा एवढा सुपरहिट झाला होता. त्यांनी दोन कलाकारांना लाँच केलं आणि त्यांचं आयुष्यच बदललं. मला फक्त ३-४ किलो वजन वाढल्यावरुन सिनेमा गमवावा लागला. नाहीतर माझंही करिअर बदललं असतं. पण मला वाटतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कारण त्यानंतर मला माझी किंमत समजली. मी पोस्टपार्टम नंतर दोन सिनेमे केलेत जे पुढील वर्षी येतील. मला माझी क्षमता माहित आहे. मी गर्वाने कॅमेऱ्यासमोर उभी राहीन हे मी ठरवलं होतं. वजनावरुन बोलणं वगैरे हे इंडस्ट्रीत खूप घडतं आणि जे पचवणं खूप कठीण असतं.