हादरवून टाकणारा क्लायमॅक्स! 'हा' मर्डर मिस्ट्री चित्रपट नेटफ्लिक्सवर नंबर १ ला करतोय ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:33 IST2025-12-23T16:32:22+5:302025-12-23T16:33:40+5:30
एकदा तुम्ही सिनेमा पाहायला सुरुवात केली की, तुम्ही अजिबात थांबणार नाही, एवढा तुम्हाला हा सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

हादरवून टाकणारा क्लायमॅक्स! 'हा' मर्डर मिस्ट्री चित्रपट नेटफ्लिक्सवर नंबर १ ला करतोय ट्रेंड
ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत असतात. पण काही चित्रपट प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडतात. सध्या नेटफ्लिक्सवर अशाच एका मर्डर मिस्ट्रीची जादू पाहायला मिळत आहे. शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला एक चित्रपट अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून, सध्या तो नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड करत आहे.
त्या चित्रपटाचं नाव आहे 'रात अकेली है: द बन्सल मर्डर्स'. 'रात अकेली है' या चित्रपटाचा पहिला भाग २०२० मध्ये आला होता आणि आता ५ वर्षांनंतर 'रात अकेली है द बन्सल मर्डर्स' हा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. २ तास १६ मिनिटांच्या या चित्रपटाची कथा बन्सल हवेलीतील एका भयानक घटनेने सुरू होते. वरवर पाहता हा एक धार्मिक किंवा आकस्मिक गुन्हा वाटत असला, तरी पोलीस तपासात कौटुंबिक गुपिते, अंधश्रद्धा आणि भ्रष्टाचाराचा एक गुंतागुंतीचा खेळ समोर येतो. एकदा तुम्ही सिनेमा पाहायला सुरुवात केली की, तुम्ही अजिबात थांबणार नाही, एवढा तुम्हाला हा सिनेमा शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
अनेकांना हा चित्रपट वास्तविक घटनेवर आधारित आहे का? असा प्रश्न पडला आहे. यावर निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की, हा चित्रपट एकाच विशिष्ट घटनेवर आधारित नसला, तरी तो अनेक वास्तविक घटनांपासून प्रेरित आहे. हळूहळू उलगडणारे रहस्य आणि समाजातील काही विदारक वास्तवावर भाष्य करणारा हा चित्रपट सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे.
दिग्गज कलाकारांची मांदियाळी
या चित्रपटाच्या यशात कलाकारांच्या अभिनयाचा मोठा वाटा आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. चित्रांगदा सिंग, राधिका आपटे, दीप्ती नवल, इला अरुण, रेवती, रजत कपूर, संजय कपूर, अखिलेंद्र मिश्रा आणि श्रीधर दुबे अशी तगडी स्टारकास्ट आहे.