'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:05 IST2025-12-31T12:04:54+5:302025-12-31T12:05:26+5:30
'३ इडियट्स'च्या सीक्वलवर दिग्दर्शक राजकुमार हिराणी काम करत असल्याचंही बोललं जात आहे. आता या चर्चांवर आर माधवनने मौन सोडलं आहे.

'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
बॉलिवूडमधील एव्हरग्रीन सिनेमा '३ इडियट्स'च्या सीक्वलची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. २००९ साली प्रदर्शित झालेल्या '३ इडियट्स'मधून आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी हे त्रिकुट प्रेक्षकांना मिळालं. आता १६ वर्षांनी हे सिनेमाच्या सीक्वलमधून हे त्रिकुट पुन्हा प्रेक्षकांना भेटायला येणार असल्याने चाहत्यांनाही उत्सुकता होती. '३ इडियट्स'च्या सीक्वलवर दिग्दर्शक राजकुमार हिराणी काम करत असल्याचंही बोललं जात आहे. आता या चर्चांवर आर माधवनने मौन सोडलं आहे.
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आर माधवनने '३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत भाष्य केलं. तो म्हणाला, "'३ इडियट्स'चा सीक्वल बनणं हे ऐकायला छान वाटतं. पण आमिर खान, शरमन आणि मी आम्ही तिघंही आता म्हातारे झालो आहोत. सीक्वल आला तरी आम्ही त्यात काय भूमिका करणार? आमचं आयुष्य कशाप्रकारे दाखवलं जाईल? ही एक चांगली कल्पना असू शकते. मात्र एका चांगल्या सीक्वलसाठी हे किती योग्य आहे हेदेखील पाहावं लागेल. मला राजकुमार हिराणींसोबत पुन्हा काम करायला आवडेल. मात्र '३ इडियट्स' पुन्हा करणं हा मुर्खपणा ठरेल".
दरम्यान, '३ इडियट्स' हा जगभरात गाजलेला बॉलिवूड सिनेमा होता. केवळ देशातच नाही तर जगात या सिनेमाने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं. जगभरात ४०० कोटींची कमाई करणारा '३ इडियट्स' पहिला भारतीय सिनेमा ठरला होता. आमिर खान, आर माधवन आणि शरमन जोशी यांच्यासह '३ इडियट्स'मध्ये बोमन इराणी, करिना कपूर, मोना सिंह आणि ओमी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.