प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचे हिंदू धर्माबद्दल वक्तव्य चर्चेत; काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:13 IST2026-02-11T11:50:58+5:302026-02-11T12:13:18+5:30
निक जोनासचे वडील Assemblies of God Church मध्ये पाद्री होते.

प्रियंका चोप्राचा पती निक जोनसचे हिंदू धर्माबद्दल वक्तव्य चर्चेत; काय म्हणाला?
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची जोडी जगभरात 'पॉवर कपल' म्हणून ओळखली जाते. प्रियंका आणि निक जोनासचं २०१८ साली मोठ्या थाटामाटात राजस्थानमधील जोधपूर येथील शाही राजवाड्यात हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न झालं होतं. त्यांनंतर काही वर्षांनी सरोगसी द्वारे त्यांना मालती मेरी ही मुलगी झाली. प्रियंका आणि निक हे मालतीचं खूप प्रेमानं संगोपण करत आहेत. विशेष म्हणजे मालतीला हिंदू धर्मांची मुल्य शिकवली जात आहेत. याबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक जोनासने सांगितलं.
निक जोनास सध्या त्याच्या “Sunday Best” या अल्बमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान The Zach Sang Show मध्ये बोलताना त्याने आध्यात्मावर भाष्य केले. निक म्हणाला, "मी हिंदू धर्माबद्दल खूप काही शिकलो आहे आणि ते खरोखरच अविश्वसनीय आहे. हा धर्म अत्यंत सखोल आणि सुंदर आहे. कर्माचे आचरण करणे, इतरांशी प्रेमाने वागणे आणि त्याचे चांगले परिणाम अनुभवणं, हे पाहणे खूप सुखद आहे. माझा विश्वास आता अधिक दृढ झाला असून तो माझ्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग बनला आहे".
मालती मेरीवर हिंदू संस्कार
निक आणि प्रियांका आपल्या मुलीला दोन्ही संस्कृतींची ओळख करून देत आहेत. निकने स्पष्ट केले की, "आम्ही आमच्या मुलीला खऱ्या हिंदू मूल्यांसह आणि त्याबद्दलच्या सखोल समजेसह वाढवत आहोत. तिच्या आध्यात्मिकतेमध्ये हा बदल घडवून आणणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे". विशेष म्हणजे निक जोनासचे वडील चर्चमध्ये पाद्री होते, तरीही निकने हिंदू धर्मातील सौंदर्य खुल्या मनाने स्वीकारले आहे.
भारताच्या पहिल्या प्रवासाची आठवण सांगताना निक भावुक झाला. तो म्हणाला, "जेव्हा मी पहिल्यांदा भारतात गेलो, तो एक जादुई अनुभव होता. प्रियंकाचे मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना मला भारतीय संस्कृतीची खरी ओळख झाली. आता तर काही भारतीय सण माझे सर्वात आवडते बनले आहेत. माझ्या आयुष्यातील काही गोड आठवणी या भारताशी जोडलेल्या आहेत".