"लग्नानंतरही अफेअर असणं आता फॅशन" स्मिता पाटीलच्या लेकानं बॉलिवूड कपल्सची केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:30 IST2026-02-06T13:28:58+5:302026-02-06T13:30:55+5:30
सध्या प्रतीक बब्बर आणि त्याची पत्नी प्रिया बॅनर्जी यांची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे.

"लग्नानंतरही अफेअर असणं आता फॅशन" स्मिता पाटीलच्या लेकानं बॉलिवूड कपल्सची केली पोलखोल
प्रतीक बब्बर हा दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा आहे. प्रतीकने २००८ साली जाने तू या जाने ना या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. सध्या प्रतीक बब्बर आणि त्याची पत्नी प्रिया बॅनर्जी यांची एक मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीतून प्रतीक आणि प्रिया यांनी बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर या सेलिब्रिटी कपल्सबद्दल त्यांनी धक्कादायक खुलासा केलाय.
प्रतीक आणि प्रियाने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडची काळी बाजू उघड केली. प्रिया बॅनर्जी म्हणाली, "बॉलिवूडमधील ९० टक्के लग्ने ही केवळ दिखाव्यासाठी आहेत. मी हे जवळून पाहिले आहे". यावर सहमती दर्शवत प्रतीक म्हणाला, "हो, ते स्पष्टपणे दिसून येतं". प्रतीकने ट्विंकल खन्नाच्या त्या वक्तव्याचा उल्लेख केला, ज्यामध्ये तिने "रात गई बात गई, इमोशनल चीट हे फिजिलक चीटपेक्षाही वाईट असतं", असं म्हटलं होतं. पुढे प्रतीक म्हणाला, "जर लग्न झालेले लोक 'रात गई बात गई’ असं म्हणत असतील, तर परिस्थिती काय आहे हे सहज कळतं".
प्रतीकने आधुनिक नात्यांमधील फसवणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, "आजच्या काळात फसवणूक करणे, अनेक पार्टनर असणे हे एक प्रकारे फॅशनेबल बनले आहे. पत्नी असूनही मैत्रीण असणे ही चांगली गोष्ट नाही, पण सध्या याकडे फॅशन म्हणून पाहिले जाते". कॅनडात वाढलेली प्रिया म्हणाली की, भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणारे मोठे कलाकार जेव्हा सामाजिक प्रतिमेसाठी लग्न टिकवून ठेवतात आणि फसवणूक करतात, तेव्हा मला त्यांची कीव येते".
प्रिया कॅनडामध्ये वाढली असून स्वतःला कॅनेडियन मानते. ती म्हणाली, "स्वतःचं करिअर घडवा, प्रेमसंबंध ठेवा, लोकांशी आदराने आणि प्रामाणिकपणे वागा. माझ्या देशात असंच होतं. आमची संस्कृती बॉलिवूड आणि भारतापेक्षा कितीतरी मजबूत आहे. इथे मात्र लोक लग्नाला जणू थट्टा समजतात".
प्रतीक आणि प्रिया सध्या त्यांच्या 'इश्क फकीर' या म्युझिक व्हिडीओचे प्रमोशन करत आहेत. प्रतीकने 'जाने तू या जाने ना'मधून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 'धोबी घाट', 'दम मारो दम', 'छिछोरे' आणि 'मुल्क' यांसारख्या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.