सुरैय्यांची अधुरी प्रेम कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 11:22 IST2017-02-06T05:52:40+5:302017-02-06T11:22:40+5:30

नामवंत अभिनेत्री, गायिका म्हणून सुरैय्या यांनी आपली कारकीर्द गाजविली. चाळीस आणि पन्नासाव्या दशकात त्यांनी सौंदर्यासोबतच आपल्या आवाजाचा दबदबा कायम ...

Parineya's unfinished love story | सुरैय्यांची अधुरी प्रेम कहाणी

सुरैय्यांची अधुरी प्रेम कहाणी

मवंत अभिनेत्री, गायिका म्हणून सुरैय्या यांनी आपली कारकीर्द गाजविली. चाळीस आणि पन्नासाव्या दशकात त्यांनी सौंदर्यासोबतच आपल्या आवाजाचा दबदबा कायम राखला.  त्याकाळात त्यांचे देव आनंद यांचे प्रेमप्रकरण खूप गाजले. याला धार्मिकतेची ही जोड होती. या वादातूनच या दोघांचे लग्न होऊ शकले नाही. अशा या प्रेमप्रकरणाचा दुर्दैवी अंत झाला.



सुरैय्या आणि देव आनंद यांची ओळख ‘जीत’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर आकर्षणात झाले. त्या काळात हे दोघे एकमेकांना प्रेमपत्र लिहीत असत. अर्थात याची माहिती सुरैय्याच्या आजी बादशाह बेगम यांना कळाली. त्यांनी या दोघांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. देव आनंद हे हिंदू. सुरैय्या या मुस्लीम. या दोघांचे लग्न झाल्यास त्याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकी देण्यात आली. सुरैय्या यांच्या घरी त्यांच्या आजीचे सर्व काही चालायचे. त्यांनी विरोध केल्याने या दोघांचा नाईलाज झाला होता. सुरैय्या यांचे लग्न देव आनंदशी व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची तयारी होती, परंतु आईना विरोध करण्याची त्यांची हिम्मत नव्हती.



सुरैय्या यांच्याशी लग्न करण्यासाठी अनेक जण तयार होते. दिग्दर्शक एम. सादिक यांचे तत्पूर्वी लग्न झाले होते. परंतु ते देखील सुरैय्या यांच्याशी लग्न करण्यास तयार होते. अभिनेता रहमान यांनीही लग्नाची तयारी दर्शविली होती. सुरैय्या यांनी एकदा मुलाखतीत ‘आपल्या अंगी विरोध करण्याचे धाडस नव्हते. आपण जेव्हा देव आनंद यांना लग्न करणार नसल्याचे सांगितले, त्यावेळी त्याने भित्रट म्हणून आपली अवहेलना केली. कदाचित मी असूही शकेन. कदाचित ही चूकही असू शकेल किंवा दैवी नशीब’ असे म्हटले होते.
जीत चित्रपटाच्या सेटवर देव आनंद आणि सुरैय्या यांचे साध्या पद्धतीने मंदिरात लग्न करण्याचा दुर्गा खोटे, द्वारका दिवेचा आणि इतरांनी घाट घातला होता, परंतु सहदिग्दर्शकाने सुरैय्याच्या आजींना ही गोष्ट सांगितली. त्यावेळी आजीने सुरैय्याना ओढून घरी आणले. त्यामुळे हा प्रयत्न देखील फसला. त्यानंतर मिर्झा गालिब या चित्रपटात सुरैय्या यांनी काम केले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे कौतुक केले, परंतु सुरैय्या सार्वजनिक जीवनात कधी आल्या नाहीत.
या दोघांच्या विरहानंतर दोघांची अवस्था खूप बिकट होती. देव आनंदच्या बंधूंमुळे ते पुन्हा उभे राहिले. त्यांनी १९५४ साली कल्पना कार्तिक यांच्याशी लग्न केले. आपल्या आत्मचरित्रात देव आनंद यांनी ‘सुरैय्यासोबत आपले प्रेम होते. आम्ही दोघेही लग्न करण्यास तयार होतो. धर्माचा प्रश्न आल्याने आम्हाला लग्न करता आले नाही. मरीन ड्राईव्हच्या एका टेरेसवर सुरैय्या यांना शेवटचे भेटलो. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता,’ असे सांगितले.



सुरैय्या यांच्या आयुष्यात मोठी अडचण असलेली त्यांची आजी आपल्या भावाकडे पाकिस्तानमध्ये निघून गेल्या. सुरैय्या आपल्या आई मुमताज बेगमसोबत राहत होत्या. त्यावेळी त्यांच्या आई त्यांची काळजी घ्यायच्या. जयराज, निम्मी, निरुपा रॉय, तबस्सूम या त्यांच्या मैत्रिणीसोबत कधीकधी त्यांची भेट व्हायची. १९८७ साली त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्या एकाकी झाल्या. २००४ साली वयाच्या ७४ व्या वर्षी एकाकी अवस्थेत त्यांना मृत्यू आला.

Web Title: Parineya's unfinished love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.