"मुलाचं संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नाही" पितृत्व रजेसाठी संसदेत कडाडले राघव चढ्ढा; पत्नी परिणीतीची पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:54 IST2026-04-01T12:27:01+5:302026-04-01T14:54:21+5:30
परिणीती चोप्राची 'ती' पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

"मुलाचं संगोपन ही केवळ आईची जबाबदारी नाही" पितृत्व रजेसाठी संसदेत कडाडले राघव चढ्ढा; पत्नी परिणीतीची पोस्ट व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे पती राघव चड्ढा यांनी राज्यसभेत पितृत्व रजेचा (Paternity Leave) महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. मुलाच्या जन्मानंतर वडिलांना मिळणारी 'पितृत्व रजा' (Paternity Leave) ही केवळ सवलत नसून तो एक 'कायदेशीर अधिकार' असावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर परिणीती चोप्राने आपल्या पतीचे मनापासून कौतुक केले आहे.
परिणीती चोप्राने एक अत्यंत भावुक पोस्ट लिहिली. "आज तुला संसदेत केवळ एक खासदार म्हणून नाही, तर आपल्या बाळाचा 'बाबा' म्हणून बोलताना पाहणे माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण ठरलाय. मुलाच्या जन्मानंतर केवळ आईचाच नवा जन्म होत नाही, तर एका वडिलांचाही जन्म होतो, हे तू तुझ्या कामातून दाखवून दिले आहेस. तू ज्या प्रकारे घरच्या जबाबदाऱ्या उचलतोस, त्याचा मला सार्थ अभिमान आहे"
ती पुढे म्हणाली, "आज तू संसदेत त्या सर्व आईंचा आवाज बनला आहेस, ज्या मुलांचे संगोपन एकट्याने करतात आणि ज्यांचे दुःख कुणी ऐकत नाही. तुझ्या या मागणीमुळे जर पालकांना, विशेषतः मातांना थोडा जरी आधार मिळाला, तर ती खूप मोठी गोष्ट असेल".