पंकज त्रिपाठींची आई हेमवंती देवी यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 10:51 IST2025-11-03T10:48:37+5:302025-11-03T10:51:59+5:30
पंकज त्रिपाठींना मातृशोक. आईचं निधन. पंकज यांच्या करिअरमध्ये त्यांच्या आईचं मोलाचं योगदान होतं

पंकज त्रिपाठींची आई हेमवंती देवी यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्या आई हेमवंती देवी यांचे ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. या दुःखद बातमीमुळे सिनेसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. पंकज त्रिपाठी यांच्या आई हेमवंती देवी यांचे निधन त्यांच्या जन्मगावी, बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यातील बेलसंड या गावात झाले. पंकज यांची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पंकज त्रिपाठी पोहोचले जन्मगावी
आईच्या निधनाची बातमी मिळताच, पंकज त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य तात्काळ मुंबईहून गोपाळगंजकडे रवाना झाले आहेत. पंकज त्रिपाठी यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये आपल्या आईसोबतच्या खास नात्याबद्दल सांगितलं आहे. त्यांच्या आईने त्यांना अभिनयात करिअर करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. साधं जीवन जगणाऱ्या त्यांच्या आई-वडिलांनी नेहमीच पंकज त्रिपाठींना त्यांच्या कलागुणांचा आदर करायला शिकवले. काहीच महिन्यांपूर्वी पंकज यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं.
या दुःखद प्रसंगी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत पंकज त्रिपाठी आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला आहे. पंकज यांनी जवळचे नातेवाईक आणि कुटुंबाच्या उपस्थितीत आईचे अंत्यसंस्कार पार पाडले. ''त्रिपाठी परिवार शोकसागरात बुडालं आहे. आमची सर्वांना विनंती आहे की, पंकज यांची आई हेमवंती देवी यांना तुमच्या प्रार्थनेत आणि आठवणीत जिवंत ठेवा. आम्ही मीडियाला विनंती करतो त्रिपाठी परिवारच्या प्रायव्हसीचा आदर करावा'', असं वक्तव्य पंकज यांच्या टीमने केलं आहे.