मुलाचा वादग्रस्त चित्रपट 'कबीर सिंग' कसा वाटला? पंकज कपूर पहिल्यांदाच स्पष्ट म्हणाले- "शाहिदने त्यात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:44 IST2025-10-06T10:40:37+5:302025-10-06T10:44:45+5:30
२०१९ साली रिलीज झालेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाला बरीच टीक सहन करावी लागली. याबद्दल शाहिदचे वडील आणि अभिनेते पंकज कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलंय

मुलाचा वादग्रस्त चित्रपट 'कबीर सिंग' कसा वाटला? पंकज कपूर पहिल्यांदाच स्पष्ट म्हणाले- "शाहिदने त्यात..."
अभिनेते पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांनी त्यांचा मुलगा शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) 'कबीर सिंग' (Kabir Singh) चित्रपटाबद्दल नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. 'कबीर सिंग' रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी चित्रपटात दाखवलेल्या मर्दानगीबद्दल आक्षेप घेतला होता. अखेर पहिल्यांदाच शाहिदचे वडील पंकज यांनी चित्रपटावर झालेल्या टीकेबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाले पंकज?
काय म्हणाले पंकज कपूर?
नुकतंच लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत पंकज कपूर यांनी 'कबीर सिंग' चित्रपटाला जी टीका सहन करावी लागली, त्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय. पंकज म्हणाले की, "जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता, तेव्हा तुम्हाला समाजात अस्तित्वात असलेली माणसं आणि त्यांच्या व्यक्तिरेखा दाखवाव्या लागतात. कबीर सिंगच्या भूमिकेबद्दल लोकांना आक्षेप असू शकतो, पण ही वस्तुस्थिती आहे की, समाजात 'टॉक्सिक मर्दानगी' (विघातक पुरुषी वृत्ती) अस्तित्वात आहे आणि ती चित्रपटांमध्ये पुढेही दिसत राहील."
पंकज कपूर पुढे म्हणाले की, ''कलाकार म्हणून त्यांचं काम केवळ समाजातील सत्य दाखवणं आहे. जर तुम्ही समाजातील गोष्टी चित्रपटातून दाखवत नसाल, तर तुम्ही वास्तववादी चित्रपट बनवत नाहीये. शाहिदने त्याचं काम चोख बजावलं आणि एका कलाकाराच्या भूमिकेचे विश्लेषण चित्रपटातील विषयापेक्षा वेगळे केलं पाहिजे.'' अशाप्रकारे पंकज यांनी शाहिदचा अभिनय आणि 'कबीर सिंग' चित्रपटाचं समर्थन केलं आहे.
'कबीर सिंग' हा चित्रपट २०१९ साली रिलीज झाला होता. या चित्रपटात शाहिद कपूर, कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली. याशिवाय संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाचंही चांगलंच कौतुक झालं. हा चित्रपट 'अर्जुन रेड्डी' या साउथ सिनेमाचा रिमेक होता.