'पंचायत'च्या सचिवजींचा कधीही न पाहिलेला खलनायकी अवतार; जितेंद्र कुमारच्या 'भागवत'चा टीझर समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:26 IST2025-09-30T12:24:40+5:302025-09-30T12:26:42+5:30
पंचायत वेबसीरिजच्या सचिवजींचा नवीन सिनेमा. सोबत अर्शद वारसी. बातमीवर क्लिक करुन टीझर बघाच

'पंचायत'च्या सचिवजींचा कधीही न पाहिलेला खलनायकी अवतार; जितेंद्र कुमारच्या 'भागवत'चा टीझर समोर
वेबसीरिजच्या दुनियेतील सर्वात लोकप्रिय अभिनेता जितेंद्र कुमारला (Jitendra Kumar) प्रेक्षकांनी आजवर 'पंचायत'मधील साध्याभोळ्या सचिवजी किंवा 'कोटा फॅक्टरी'मधील प्रेमळ शिक्षक म्हणून पाहिले आहे. पण आता तो एका पूर्णपणे खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. जितेंद्र कुमार आणि अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'भागवत चॅप्टर १: राक्षस' (Bhagwat Chapter 1: Raakshas) या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
काय आहे टीझरमध्ये?
५९ सेकंदांच्या या टीझरची सुरुवात जितेंद्र कुमारच्या गंभीर आवाजातील एका प्रभावी संवादाने होते. यामध्ये तो गरुड पक्षाचे उदाहरण देत म्हणतो की, ''३५ वर्षानंतर गरुडाचे पंख जेव्हा कमजोर होतात, तेव्हा तो शिकार करू शकत नाही. त्यामुळे एका दगडावर जाऊन तो आपले पंख तोडतो आणि नवीन पंख आल्यावर पुन्हा शिकार सुरू करतो.'' त्यानंतर अर्शद वारसी त्याला विचारतो, "तुला माहीत आहे, तू कोण आहेस?" यावर जितेंद्र निर्भीडपणे उत्तर देतो, "गरुड आहे मी."
टीझरमध्ये अर्शद वारसी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, तर जितेंद्र कुमार हा गुन्हेगाराच्या भूमिकेत आहे. या सिनेमात जितेंद्रने कोणता मोठा गुन्हा केला आहे आणि अर्शद वारसी त्याचा छडा कसा लावतो, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
'जीतू भैय्या' म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या जितेंद्र कुमारला पहिल्यांदाच अशा नकारात्मक भूमिकेत पाहून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अनेकांनी या भूमिकेसाठी त्याचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी तर अर्शद वारसीच्या गाजलेल्या 'असुर' (Asur) या वेब सीरिजसारखीच ही फिल्म 'मास्टरपीस' ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 'भागवत चॅप्टर १: राक्षस' या चित्रपटात जितेंद्र कुमार आणि अरशद वारसी यांच्यासोबत आयेशा कडुस्कर देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अक्षय शेरे यांनी याचं दिग्दर्शन केले आहे, तर जिओ स्टुडिओज आणि बावेजा स्टुडिओ यांनी याची निर्मिती केली आहे. लवकरच हा चित्रपट ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.