"तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल..." दाऊदच्या ड्रग्ज पार्टीला उपस्थित असल्याचा आरोपांवर नोरा फतेही म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 15:59 IST2025-11-16T15:54:04+5:302025-11-16T15:59:53+5:30
दाऊदच्या ड्रग्ज पार्टीला उपस्थित असल्याचा आरोपांवर नोरा फतेहीनं पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला.

"तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल..." दाऊदच्या ड्रग्ज पार्टीला उपस्थित असल्याचा आरोपांवर नोरा फतेही म्हणाली...
Nora Fatehi On Drug Syndicate Allegations : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी थेट संबंध असलेल्या एका विशाल आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदु असलेल्या सलीम डोलाच्या गँगचा सदस्य मोहम्मद सलमान सफी शेख याला दुबईतून भारतात आणण्यात आले आहे. सलीम डोला हा पूर्वीपासूनच त्याचा मुलगा ताहिर डोला याच्यामार्फत भारतात मेफेड्रोन म्हणजे 'मेयाउ-मेयाउ' ड्रग्जची तस्करी करत होता. त्याने कबूल केले आहे की, तो मुंबई, गोवा, दुबई आणि थायलंडसह देश-विदेशांत हाय-प्रोफाइल ड्रग्ज पार्ट्या आयोजित करत होता. या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडचे मोठे कलाकार, मॉडेल्स, रॅपर्स आणि चित्रपट निर्माते सहभागी होत होते. त्यात नोरा फतेहीचे देखील नाव समोर आलं आहे. त्यावर आता नोराने स्पष्टीकरण दिले आहे.
नोराने या संपुर्ण प्रकरणावर भाष्य करत एक स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला. तिनं लिहलं, "मी अशा पार्ट्यांमध्ये जातच नाही. मी सतत प्रवासात असते आणि माझ्या कामावर माझं खूप प्रेम आहे. त्यामुळे, माझं खासगी आयुष्यही नाहीये. मी स्वतःला अशा पार्टी करणाऱ्या लोकांशी जोडत नाही. माझ्या सुट्टीच्या दिवशी मी एकतर दुबईतील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या माझ्या घरी आराम करत असते किंवा माझ्या हायस्कूलच्या जुन्या मित्रांसोबत असते. मी माझा संपूर्ण दिवस आणि रात्री फक्त माझ्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर काम करत असते".

आपलं नाव जाणूनबुजून चुकीच्या बातम्यांमध्ये ओढलं जात आहे, असा आरोप तिने केला. पुढे तिनं लिहलं, "तुम्ही जे काही वाचता त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. जाणूनबुजून मला टार्गेट केलं जात आहे. पण यावेळी मी ते अजिबात सहन करणार नाही. हे आधी एकदा घडलं होतं, तुम्ही लोकांनी खोटं बोलून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. आणि मी ते शांतपणे पाहत होते. जेव्हा प्रत्येक जण माझं नाव बदनाम करण्याचा, माझी प्रतिष्ठा खराब करण्याचा आणि मला 'क्लिकबेट' म्हणून वापरण्याचा प्रयत्न करत होता. माझ्याशी काहीही संबंध नसलेल्या परिस्थितीत माझं नाव आणि प्रतिष्ठा वापरण्यापासून कृपया दूर रहा. याची मोठी किंमत मोजावी लागेल", असा थेट इशारा तिने दिला आहे.