"बॉलिवूड आता टॉक्झिक झालं आहे...", नील नितीन मुकेशने इंडस्ट्रीवर काढला राग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:04 IST2025-05-12T14:03:39+5:302025-05-12T14:04:05+5:30
सध्या नील 'है जुनून' या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बऱ्याच काळानंतर तो पडद्यावर दिसणार आहे.

"बॉलिवूड आता टॉक्झिक झालं आहे...", नील नितीन मुकेशने इंडस्ट्रीवर काढला राग
बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश (Neil Nitin Mukesh) अनेकदा बॉलिवूडवर आरोप लावले आहेत. तसंच इंडस्ट्रीने कायम त्याची खिल्ली उडवल्याचाही त्याचा आरोप होता. सध्या नील 'है जुनून' या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बऱ्याच काळानंतर तो पडद्यावर दिसणार आहे. एका मुलाखतीत त्याने इंडस्ट्रीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याच्या वक्तव्यामुळे सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे गेलं आहे.
नील नितीन मुकेश इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "इंडस्ट्रीतील अनेक लोक दुसऱ्यांच्या अपयशावर आनंद साजरा करतात. इंडस्ट्रीत नकारात्मकता आणि टीकेचं वातावरण इतकं वाढलं आहे की हे आता खूप टॉक्झिक झालं आहे. एकमेकांच्या यशाची स्तुती करण्याऐवजी लोक दुसऱ्यांच्या अपयशाचीच जास्त चर्चा करत आहेत."
तो पुढे म्हणाला,"कलाकारांच्या टॅलेंटपेक्षा त्यांना दिसण्यावरुन, बॉडीवरुन जास्त ट्रोल केलं जातं. राज कपूर यांच्या काळात इंडस्ट्रीत पॅशन आणि सहकार्याची भावना असायची. आज लोक आपल्याकडील चांगल्या गोष्टी लपवतात आणि एकमेकांशी स्पर्धा करण्यातच त्यांना जास्त रस असतो. इंडस्ट्रीत प्रत्येक जण आपल्या राहिलेल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे वातावरण आणखी जास्त वाईट होत आहे."
'है जुनून' सीरिज १६ मे रोजी जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या माध्यमातून नील ओटीटीवर पदार्पण करत आहे. हा म्युझिकल ड्रामा असून यामध्ये जॅकलीन फर्नांडिस, बोमन ईरानी, सिद्धार्थ निगम, सुमेध मुदगलकर यांची भूमिका आहे.