"अक्षय खन्नासारखं ६ वर्ष घरी बसून...", नेहा धुपियाने अभिनेत्याकडून घेतली प्रेरणा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:35 IST2026-01-05T17:34:17+5:302026-01-05T17:35:22+5:30
काम मिळत नसेल तेव्हा मी घरी..., नेहा धुपिया स्पष्टच बोलली

"अक्षय खन्नासारखं ६ वर्ष घरी बसून...", नेहा धुपियाने अभिनेत्याकडून घेतली प्रेरणा, म्हणाली...
अभिनेत्री नेहा धुपिया सध्या 'सिंगल पापा' आणि 'परफेक्ट फॅमिली' या दोन शोजमुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळाने नेहा सध्या अॅक्शनमध्ये आहे. एकामागोमाग एक तिचे प्रोजेक्ट्स रिलीज होत आहेत. मधल्या काळात तीन-चार वर्ष नेहाकडेही काहीच काम नव्हतं. ती घरीच बसली होती यामुळे तिला नैराश्यही आलं होतं. ती सतत रडायची. मात्र आता तिने अक्षय खन्नाचं नाव घेत त्याच्याकडून प्रेरणा घेतल्याचं वक्तव्य केलं आहे. नक्की काय म्हणाली नेहा धुपिया?
'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत नेहा धुपिया म्हणाली, "जेव्हा माझ्याकडे काम नसतं तेव्हा मला अस्वस्थ वाटतं. इंडस्ट्रीत २० वर्ष झाल्यानंतर जेव्हा काम नसतं तेव्हा मी अक्षरश: घरी रडत असते. मी तीन दिवसांपूर्वीही हेच केलं. मला काही रडगाणं गायचं नाही कारण मला सिनेमांमध्ये काम करायला आवडतं. ही गोष्ट मला कधीच निराश करत नाही. महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे काम नसेल तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे कामच काम असतं. तेव्हा अजून निराश वाटतं. मला या नैराश्यातून बाहेर पडायचं आहे. मी अनेकदा यातून गेली आहे."
अक्षय खन्नाचं नाव घेत नेहा म्हणाली, "एका कामानंतर त्यातून दुसरं काम मिळणं खूप गरजेचं आहे. जर मला माझ्या या दोन शोजनंतर काही मिळालं नाही तर काय फायदा? कामातून आणखी चांगलं काम खरंच मिळतं का? कधी कधी हे समजतच नाही. मग मी अक्षय खन्नाच्या करिअरमधून प्रेरणा घेते की कसं ६ वर्ष घरी बसल्यानंतर आज त्याला एकापेक्षा एक दमदार काम मिळत आहे. मलाही अशीच आशा आहे."