ऐ नर्गिसे मस्ताना: नर्गिस यांची प्रेमळ परिकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 20:01 IST2017-02-03T14:31:09+5:302017-02-03T20:01:09+5:30

नर्गिसचे नाव घेतले की साहजिकच समोर येतो तो श्री ४२० मधील त्यांचा फोटो. त्यानंतर राज कपूरसोबतचे त्यांचे नाते आणि ...

A Nargis Mastana: Nargis' fairy fairytale | ऐ नर्गिसे मस्ताना: नर्गिस यांची प्रेमळ परिकथा

ऐ नर्गिसे मस्ताना: नर्गिस यांची प्रेमळ परिकथा

्गिसचे नाव घेतले की साहजिकच समोर येतो तो श्री ४२० मधील त्यांचा फोटो. त्यानंतर राज कपूरसोबतचे त्यांचे नाते आणि त्यानंतर सुनील दत्तसोबत त्यांनी केलेले लग्न. हा संपूर्ण प्रवास पाहिल्यानंतर आयुष्यात प्रेम म्हणजे काय असते, याची प्रचिती आपणास येईल. राज कपूरसोबतचे नाते तोडल्यानंतर आत्महत्या करण्यास निघालेल्या नर्गिस यांनी सुनील दत्तसोबत लग्न करुन अत्यंत छान संसार केला.
१९३५ साली नर्गिस ज्यांचे मूळ नाव फातिमा असे होते, त्यांनी तलाश-ए-हक चित्रपटातून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. ज्यावेळी त्या सहा वर्षांच्या होत्या. त्यांना बेबी नर्गिस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी हेच नाव शेवटपर्यंत धारण केले. १९४३ साली त्यांनी मोतीलाल यांच्यासमवेत वयाच्या १४ व्या वर्षी चित्रपट केला. १९४० आणि ५० च्या दशकात त्या खूप गाजल्या. बरसात, आवारा, अंदाज, श्री ४२०, दीदार,  चोरी चोरी, मदर इंडिया यासारखे चित्रपट केले. 



राज कपूर
राज कपूर आणि नर्गिस यांची भेट हा खूप वेगळा किस्सा आहे. राज कपूर हे ‘आग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. फेमस स्टुडिओत त्यांना जागा मिळावी म्हणून ते नर्गिस यांच्या आई जद्दनबाई यांना भेटण्यासाठी  मरीन ड्राईव्ह येथील अपार्टमेंटमध्ये गेले. ज्यावेळी त्यांनी डोअरबेल वाजविली, त्यावेळी दरवाजा या जद्दनबाई उघडतील अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु एक सुंदर मुलगी अर्थात नर्गिस समोर आली. नर्गिसने विचारले कोण आहात आपण? नर्गिसना पाहून ‘आग’ या चित्रपटासाठी आल्याचे राज कपूर विसरून गेले. त्यांनी नर्गिस यांना चित्रपटात घेतले. त्यानंतर त्यांच्यात आकर्षण निर्माण झाले. नर्गिस यांना राज कपूर यांचे लग्न झाल्याचे माहिती होते. आग हा या दोघांचा पहिला चित्रपट. त्यानंतर बरसात (१९४९) या चित्रपटानंतर त्यांच्यातील संबंध आणखी जुळून आले. राज आणि नर्गिस यांनी जवळपास १६ चित्रपट एकत्र केले. 
या दोघांची केमिस्ट्री खूपच छान होती. लोक त्यांना चित्रपटाशिवाय एकत्र पाहू इच्छित होते. राज कपूर यांचा करिष्मा अधिकाधिक वाढला होता. या दोघांनी भारतीय चित्रपटातील प्रेम अधिक दृढ केले. चित्रपटातील यांच्या भूमिका लोकांना आपल्याशा वाटायला लागल्या. श्री ४२० हा चित्रपट सुपरहिट झाला. हा चित्रपट आजही लोकांना तितकाच आवडतो. बॉलिवूड चित्रपटातील सर्वात सुंदर रोमँटिक चित्रपटामध्ये याचे नाव घेतले जाते. चोरी चोरी हा त्यांचा राज कपूरसोबतचा शेवटचा चित्रपट. जागते रहो मध्ये त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. बॉबी चित्रपटातून त्यांनी आपल्या प्रेमाची कथा दर्शविली होती. 
राज कपूर यांना मीना कुमारी यांच्यासोबत पाहिल्यानंतर नर्गिस यांचा पारा वाढला. राज कपूर यांचे लग्न झाले हे माहिती असतानाही नर्गिस यांना त्यांच्याकडून लग्नाची अपेक्षा होती; मात्र नंतर ती फोल ठरताना दिसू लागली. त्यातच राज कपूर हे कधीही प्रामाणिक राहत नसल्याचे नर्गिस यांना वाटू लागल्याने त्यांनी राज कपूर यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.



सुनील दत्त
नर्गिस आणि सुनील दत्त यांची लव्ह स्टोरी परिकथेप्रमाणे आहे. सुनील दत्त यांनी ज्यावेळी नर्गिस यांना पाहिले होते, त्या पहिल्या भेटीतच त्यांचे नर्गिस यांच्यावर प्रेम जडले होते. १९५८ साली नर्गिस यांची भेट सुनील दत्त यांच्यासोबत झाली. त्यावेळी सुनील दत्त हे करिअरसाठी धडपडणारे कलाकार होते तर नर्गिस या नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. मदर इंडियाच्या सेटवर आग लागली असताना सुनील दत्त यांनी  नर्गिस यांचे प्राण वाचविले. यामुळे त्या खूपच इम्प्रेस झाल्या. सुनील दत्त यांना खूप भाजले होते. नर्गिस यांनी त्यांची सुश्रुषा केली. यावेळी दोघे एकत्र आले. त्यांचे शेअरिंग सुरू झाले. 
सुनील दत्त हे राज कपूर यांच्यापेक्षा खूप वेगळे होते. राज कपूर यांची अनेक प्रेमप्रकरणे होती आणि नर्गिसना त्रास द्यायचे. ज्यावेळी सुनील दत्त त्यांच्या आयुष्यात आले, त्यावेळी नर्गिस या भावनिकरित्या कोसळल्या होत्या. सुनील यांनी त्यांना आधार दिला. एका मुलाखतीत त्यांनी आपण राज कपूरसोबतचा भूतकाळ आणि सुनील दत्त यांच्यासोबतचा भविष्यकाळ याबाबत बोलायला घाबरत नसल्याचे सांगितले होते. ज्या ज्यावेळी मला रडू यायचे, त्यावेळी त्यांनी आपला खांदा मला दिला आणि माझे सारे अश्रू त्यांनी शोषून घेतले, असेही नर्गिस यांनी सांगितले. या दोघांनी लग्नाचा घेतलेला निर्णय बॉलिवूडला धक्का देणारा ठरला. सुनील यांनी आयुष्यभर नर्गिस यांची साथ दिली. खºया अर्थाने हे प्रेम होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.



सुनील आणि नर्गिस यांना संजय, प्रिया आणि नम्रता ही तीन मुले झाली. त्यात संजय हा अभिनेता म्हणून पुढे आला तर प्रिया ही राजकीय क्षेत्रात गेली.


Web Title: A Nargis Mastana: Nargis' fairy fairytale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.