नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष, दोन दिवसात कमावले अवघे इतके लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 12:22 IST2024-12-22T12:21:43+5:302024-12-22T12:22:23+5:30
नाना पाटेकर यांच्या वनवास सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील लेटेस्ट कमाई समोर आली आहे (nana patekar, vanvaas)

नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर संघर्ष, दोन दिवसात कमावले अवघे इतके लाख
अभिनेते नाना पाटेकर यांचा या वर्षातला बहुचर्चित सिनेमा म्हणजे 'वनवास'. 'गदर' आणि 'गदर २' या सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'वनवास' सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या सिनेमाचा ट्रेलर बघून नाना पाटेकरांचा आजवरचा हा वेगळा सिनेमा असेल असंं बोललं जात होतं. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्याविषयीचे रिव्ह्यूही समोर आले. परंतु तरीही नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संघर्ष करावा लागतोय असं दिसतंय.
वनवास सिनेमाने दोन दिवसात कमावले फक्त....
२० डिसेंबरला नाना पाटेकर यांचा बहुचर्चित 'वनवास' सिनेमा रिलीज झाला. सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांच्या संमीश्र प्रतिक्रिया समोर आल्या. परंतु कमाईच्या बाबतीत मात्र सिनेमाच्या वाट्याला खरोखरचा वनवास आलाय की काय, असं बोललं जातंय. सेकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'वनवास' सिनेमाने अवघ्या दोन दिवसात फक्त ८८ लाखांची कमाई केलीय. 'वनवास' सिनेमा ३० कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेलाय. त्यामुळे कमाईच्या बाबतीत सिनेमाने बजेटचा आकडाही अजून वसूल केला नाही, असं दिसतंय.
'वनवास' सिनेमाविषयी
अनिल शर्मा यांच्या 'वनवास' सिनेमाचा बॉक्स ऑफिस कमाईचा आकडा निराशाजनक असल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा २ : द रुल' चित्रपट धुमाकूळ घालत असताना त्यात 'मुसाफा : द लायन किंग' रिलीज झाला. या क्लॅशचा परिणाम 'वनवास' चित्रपटावर झाला आहे. त्यामुळे आता शनिवार-रविवारच्या वीकेंडमध्ये नाना पाटेकर यांचा 'वनवास' सिनेमा किती कमाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.