सचेत-परंपराची पश्चिम बंगालमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट, जमलेल्या गर्दीने कारची काचच फोडली; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:56 IST2026-01-01T15:55:22+5:302026-01-01T15:56:15+5:30
कारची काच फुटली तेव्हा दोघंही गाडीतच होते

सचेत-परंपराची पश्चिम बंगालमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट, जमलेल्या गर्दीने कारची काचच फोडली; व्हिडीओ व्हायरल
संगीत जगतातील प्रसिद्ध जोडी सचेत परंपरा यांची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. 'कबीर सिंह'मधली गाणी असो किंवा 'रांझन' त्यांची अनेक गाणी गाजली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी दोघांचे काही सिंगल अल्बम्सही रिलीज झाले होते. त्यांचं 'शिव तांडव स्तोत्रम' आणि इतर गाणी हिट झाली होती. नुकतीच त्यांची नवीन वर्षानिमित्त पश्चिम बंगालमध्ये कॉन्सर्ट झाली. मात्र या कॉन्सर्टमध्ये दोघंही गर्दीत अडकले. जमलेल्या लोकांनी अक्षरश: त्यांच्या गाडीची काचही फोडली.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येचा हा व्हिडीओ आहे. सचेत टंडन आणि परंपरा ठाकुर दोघंही गाडीत बसले आहेत. दोघंही आपली कॉन्सर्ट संपवून परत येत होते. यावेळी मोठी गर्दी जमा झाली आणि लोकांनी त्यांच्या कारची काच अक्षरश: फोडली. यावेळी परंपरा गाडीत बसून व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. अचानक काच फोडल्याने सचेत परंपरा दोघंही शॉक झाले.
सचेत परंपराचा हा व्हिडीओ खूपच धक्कादायक आहे. 'काय वेडेपणा आहे','पश्चिम बंगालमध्ये कॉन्सर्ट कशाला करायची?' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सचेत परंपराने हा व्हिडीओ अद्याप त्यांच्या अकाऊंटवर शेअर केलेला नाही. तसंच त्यांनी या घटनेवर प्रतिक्रियाही दिलेली नाही. दोघांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.