घुसखोरीनंतर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढली, पोलिसांनी लागू केला 'हा' नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 15:13 IST2025-05-23T15:13:31+5:302025-05-23T15:13:44+5:30
सलमानच्या घरात घुसण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेसाठी नवे कठोर पावले उचलली आहेत.

घुसखोरीनंतर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढली, पोलिसांनी लागू केला 'हा' नियम
Salman Khan Security: भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेल्या सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एवढेच काय तर गॅलक्सी अपार्टमेंटवर गोळीबारही झाला होता. यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती. इतकी सुरक्षा असतानाही नुकतंच सलमानच्या घरात घुसण्याचा एका मॉडेलनं प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक व पोलिसांची नजर चुकवून गुरूवारी ही तरूणी सलमानच्या इमारतीत शिरली होती. दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी मंगळवारी एका व्यक्तीने सुरक्षारक्षकांना चकमा देत घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. सलग दोन रात्री सलमानच्या घरात घुसण्याचा अज्ञातांकडून प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेसाठी नवे कठोर पावले उचलली आहेत.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, सलमान खानच्या सुरक्षेबाबत आता नवी प्रणाली अमलात आणण्याचा विचार सुरू आहे. आता गॅलेक्सी बिल्डिंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कोणत्याही नवीन व्यक्तीला तिथे वास्तव्याला असलेल्या रहिवाशांकडून ओळख पटवून घ्यावी लागेल. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कोणत्याही रहिवाशाने अनोळखी व्यक्तीची ओळख आधीच पोलिसांशी अथवा सिक्युरिटीशी शेअर करणे आवश्यक असेल. त्यानंतर बिल्डिंगमध्ये प्रवेश दिला जाईल.
मुंबई पोलिसांच्या मते, अशी ओळख पडताळणीची व्यवस्था लागू केल्यास, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश टाळता येईल आणि अभिनेता सलमान खानला दिली जाणारी सुरक्षा अधिक मजबूत होईल. अनेक सोसायट्यांमध्ये आधीपासूनच ओळख पडताळणीचा हा नियम आहे. म्हणजेच एखादा पाहुणा आला तर सिक्युरिटी गार्ड संबंधित रहिवाशाशी इंटरकॉमवरून संपर्क साधतो आणि परवानगी मिळाल्यानंतरच प्रवेश दिला जातो. मग ज्याला आधीपासूनच Y+ श्रेणीची सुरक्षा आहे, अशा मोठ्या कलाकाराच्या सुरक्षेच्या बाबतीत ही बेसिक पद्धत अद्याप का लागू झाली नव्हती? हा प्रश्न निर्माण झाला आहे.