"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:38 IST2025-05-03T14:37:18+5:302025-05-03T14:38:23+5:30
मिका सिंग आणि सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. अशातच मिका सिंगने एका मुलाखतीत सलमानचा आजवर कधीही न ऐकलेला खास किस्सा शेअर केलाय. काय म्हणाला मिका, नक्की वाचा

"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
सलमान खान (salman khan) हा बॉलिवूडचा सुपरस्टार. गेली अनेक वर्ष सलमान खान हा प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. सलमानचे अलीकडचे सिनेमे इतके चालले नसले तरीही भाईजानचं फॅन फॉलोईंग तसूभरही कमी झालं नाहीये. सलमानचे इंडस्ट्रीतील अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शाहरुख, आमिर, संजय दत्त, अक्षय कुमार अशा अनेक सुपरस्टारचे सिनेमे सलमान खान प्रमोट करताना दिसतो. अशातच सलमानचा जिगरी मित्र आणि गायक मिका सिंगने (mika singh) सलमान खानविषयी कधीही न ऐकलेली एक गोष्ट सांगितली आहे. जी वाचून तुम्हालाही मजा येईल.
दोन पेग मारल्यानंतर सलमान खान काय करतो?
शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत मिका सिंगने हा मजेशीर खुलासा केला. तो म्हणाला की, "सलमान भाई सकाळी वेगळा असतो आणि रात्री वेगळा असतो. सलमान खान माझ्याशी खूप मोकळेपणाने वागतो. दोन पेग मारल्यानंतर भाईजान माझ्याशी कोणताही आडपडदा न ठेवता बरोबरीचा व्यवहार करतो. परंतु यामुळे तुम्ही गोंधळून जाता कामा नये. तुम्हीही दोन पेग किंवा चार पेग मारले असले तरीही समोर सलमान खान बसला आहे, याचं भान असावं."
सलमान खानला भेटण्याची योग्य वेळ कोणती?
मिका सिंगने याच मुलाखतीत सलमानला भेटण्याची योग्य वेळ कोणती याचा खुलासा केला. तो म्हणाला की, "मी ही गोष्ट कधी सांगितलं नाही. पण एकदा मीत ब्रदर्सला सलमान खानला भेटायचं होतं. त्यावेळी मीत ब्रदर्स सलमानला रात्री भेटले. कारण सकाळी भाईजान थोडा वैतागलेला असतो. संध्याकाळी ६ नंतर मात्र सलमानचा मूड चांगला असतो. त्यामुळे संध्याकाळी ६ नंतर तुम्ही एखाद्या गाण्याच्या साथीने सलमानला भेटलात, तर ती भेट चांगली ठरते. त्यावेळी मीत ब्रदर्सने सलमान खानसोबत रात्री बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि सकाळी ते रेस ३ च्या प्रिमिअरला गेले."
"प्रिमिअरला ते उत्सुकतेने सलमान खानची वाट बघत उभे होते. सलमान खान आला आणि त्याने मीत ब्रदर्सकडे साफ दुर्लक्ष केलं. काल रात्रीच आम्ही एकत्र बिर्याणी खाल्ली आणि आज भाईजान माझ्याकडे बघतही नाहीये, म्हणून मीत ब्रदर्स गोंधळात पडले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. कारण सकाळी भाईजान आपल्या विचारात मग्न असतात." अशाप्रकारे मिका सिंगने खास गोष्ट सांगितली.