शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'मध्ये भाव खाऊन गेला मराठमोळा गायक, डॅशिंग इनस्पेक्टरची साकारली भूमिका, होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:43 IST2026-02-13T15:43:21+5:302026-02-13T15:43:55+5:30
शाहिदच्या 'ओ रोमियो'ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. पण, शाहिदच्या या सिनेमात एक मराठमोळा गायक मात्र भाव खाऊन गेला आहे.

शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो'मध्ये भाव खाऊन गेला मराठमोळा गायक, डॅशिंग इनस्पेक्टरची साकारली भूमिका, होतंय कौतुक
शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते त्याच्या या सिनेमाची वाट पाहत होते. या सिनेमाच्या ट्रेलरनेच चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. सिनेमातील शाहिदचा गँगस्टर लूक चाहत्यांना भलताच भावला. त्यामुळेच या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. शाहिदच्या 'ओ रोमियो'ची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. पण, शाहिदच्या या सिनेमात एक मराठमोळा गायक मात्र भाव खाऊन गेला आहे.
'ओ रोमियो' सिनेमात मराठी गायक राहुल देशपांडे झळकले आहेत. त्यांनी सिनेमात डॅशिंग इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. 'ओ रोमियो'मध्ये राहुल देशपांडे इन्स्पेक्टर पाठारेच्या भूमिकेत आहेत. त्यांनी तृप्ती डिमरीसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यांच्या भूमिकेचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. अंकिता शेगडे या अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये राहुल देशपांडेंचं कौतुक केलं आहे. "राहुल दादा तुझा पहिला बॉलिवूड सिनेमा. हा फक्त सिनेमा नाही तर तुला हार्ड वर्क करताना पाहिलेल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे", असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत राहुल देशपांडेंचं अभिनंदन केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच राहुल देशपांडेंनी 'ओ रोमियो'चं पोस्टर शेअर केलं होतं. याआधी त्यांनी एका मराठी सिनेमात काम केलं आहे. 'ओ रोमियो'मध्ये शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, रणदीप हुड्डा, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पटानी, अविनाश तिवारी अशी स्टारकास्ट आहे.