‘कल किसने देखा...’; राज कौशल यांची ‘ती’ पोस्ट दुर्दैवानं खरी ठरली...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 13:03 IST2021-07-01T12:58:36+5:302021-07-01T13:03:29+5:30
अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती आणि दिग्दर्शक- निर्माता राज कौशल यांचं ३० जून रोजी निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती. त्यांची एक जुनी पोस्ट सध्या व्हायरल होतेय.

‘कल किसने देखा...’; राज कौशल यांची ‘ती’ पोस्ट दुर्दैवानं खरी ठरली...!
अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi ) पती आणि दिग्दर्शक- निर्माता राज कौशल (Raj Kaushal ) यांनी रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केली होती. अनेक सेलिब्रिटी या पार्टीला हजर होते. या पार्टीच्या धम्माल मस्तीचे फोटोही राज यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. बुधवारी रात्री नेमका नियतीनं डाव साधला आणि राज कौशल यांची प्राणज्योत मालवली. ३० जून रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं आकस्मित निधन झालं. (Raj Kaushal death ) त्यांच्या मृत्यूची बातमी सर्वांसाठीच धक्कादायक होती. पण आयुष्य किती अनपेक्षित वळणांचं असतं, याची जाणीव राज यांना असावी. त्यांची एक जुनी पोस्ट सध्या व्हायरल होतेय. (Raj Kaushal Instagram post) या पोस्टमध्ये त्यांनी आयुष्य किती अनपेक्षित आहे, हे लिहिलं आहे.
गेल्या ३० एप्रिल रोजी राज कौशल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. जी अखेर खरी ठरली. ‘उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे. आज जगून घ्या. एकच आयुष्य आहे...,’ असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं. काळ आपल्यावर टपून बसलाय, याची कल्पना कदाचित त्यावेळी त्यांनाही नसावी.
रविवारी राज व मंदिरा यांनी काही मित्रांना पार्टी दिली होती. त्याचे फोटो राज यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. नुकत्याच झालेल्या या पार्टीमध्ये नेहा धूपिया, अंगद बेदी, जहीर खान, सागरिका घाटगे, आशीष चौधरी अशा अनेकांनी हजेरी लावली होती.
‘सुपर संडे, सुपर फ्रेंड्स, सुपर फन’, असं कॅप्शन हे फोटो शेअर करताना त्यांनी दिलं होतं. राज यांची ही पोस्ट अखेरची ठरली. मंदिरा आणि राज दोघेही आपल्या मित्रपरिवारा सोबत धम्माल मस्ती करायचे. राज यांनी जाहिराच्या क्षेत्रामध्ये खूप लोकप्रियता मिळवली होती. आजही त्यांची जाहिरात एजन्सी ही आघाडीची संस्था म्हणून ओळखली जाते. राज यांनी शादी के लड्डू,अँथनी कौन है, प्यार में कभी कभी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.